

नाशिक : पूर्वा गोर्डे
दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकमधील आधार आश्रमात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांचे प्रेम व आनंद अनुभवता येणार नाही, त्यांना या आश्रमात घर आणि कुटुंबाचा अनुभव मिळतो. डॉ. विष्णू बाळकृष्ण बेहरे यांनी स्थापन केलेल्या या आश्रमात दिवाळीच्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
आश्रमातील मुलांची दिवाळी आनंदात जावी यासाठी, त्यांच्या आई-वडिलांच्या आठवणीत विविध संस्था व व्यक्तींच्या सहकार्यातून एक विशेष दानपेटी तयार करण्यात आली आहे. यात जमा झालेल्या निधीतून मुलांसाठी नवीन कपडे, फराळ, फटाके आणि त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी केली जाते. यावर्षी दिवाळीच्या विशेष तयारीसाठी आश्रमातील सर्व मुलांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून आश्रम परिसर स्वच्छ केला, रांगोळ्या काढल्या आणि चिवडा, करंजी, लाडू, शेव यांसारखा पारंपरिक फराळ बनवण्यात मदत केली. मुलांमध्ये दिवाळीचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला होता.
हितचिंतकांचे अमूल्य सहकार्य
आश्रमाचे कर्मचारी राहुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातील सर्व कर्मचारी तसेच हितचिंतक आणि देणगीदार हे आश्रमातील मुलांसाठी नवीन कपडे, फराळ आणि फटाके उपलब्ध करून देतात. त्यांच्या या मदतीनेच सर्व मुले एकत्र येऊन दिवाळीचा आनंद घेतात. ज्या मुलांना कधीही प्रेमाचा आणि सणाचा अनुभव घेता आला नसता, त्यांना आश्रमामुळे आपुलकीच्या वातावरणात दिवाळी अनुभवता येते.