

नाशिक : जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, चटका देणारे ऊन आणि असा उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. सोमवारी (दि. ११) जिल्ह्याचे सरासरी तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळला, सकाळी आठपासूनच चटका देणारे ऊन पडत आहे.
दुपारच्या वेळी उष्ण वारे देखील वाहत असल्याने एक प्रकारे उष्णतेची लाट आहे. ही लाट आणखी आठवडाभर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. १५ तारखेला येणाऱ्या दक्षिणेकडील चक्रीवादळाचा परिणाम तापमान कमी होण्यावर होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वच प्रमुख रस्ते ओस पडलेले असतात. बाजारपेठेवरदेखील त्याचा परिणाम होत असून, ऐन सुट्टी आणि लग्न सिझनमध्ये प्रवासी संख्या रोडावली आहे. सोमवारी शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या रविवार कांरजा, सराफ बाजार येथे देखील शुकशुकाट दिसून आला होता. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
असे वाढत गेला तापमानाचा पारा
जिल्हयात गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा ४० अंशांपुढेच राहत गेला आहे. सोमवारी तापमान ४१.०६ अंश होते. शनिवारी ४० अंशांवर गेले होते. सोमवारी तर दोन अंशाने वाढ होऊन थेट ४२ अंशांपर्यंत गेले. येत्या चार दिवसात देखील तापमानाचा पारा हा ४३ ते ४४ अंशांदरम्यान राहणार आहे.
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाजानुसार सोमवारी व मंगळवारी तापमान ४२ ते ४४ अंशाच्या घरात राहील. बुधवारी पारा खाली येऊन ४३ च्या खाली सरकेल. गुरुवारपासून पारा ४० ते ४२ अंशांपर्यंत राहील.
शुक्रवारनंतर तापमानात पुन्हा बदल होऊन चक्रीवादळाचा परिणाम होऊन तापमान कमी होण्याची शक्यता आहे. काही भागात तुरळक स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे.
सोमवारी हवेचा वेग
देखील कमी झाला होता. दुपारच्या वेळी उष्ण वारे कायम होते. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपाच्या होत्या. आर्द्रता २३ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.
एप्रिलमध्ये सर्वोच्च नोंद
यापूर्वी २६ एप्रिल रोजी ४१.६ अंश सेल्सिअस ची नोंद झाली होती. त्यानंतर तापमान ३८ ते ४० अंशांदरम्यान राहत होते. सोमवारी सर्वोच्च नोंद झाली.
बाजारपेठेत शुकशुकाट
दुपारच्या वेळी बाजारपेठेत अक्षरशः शुकशुकाट दिसून येतो. सध्या लग्न सराई सुरू असल्याने बाजारात गर्दी होणे अपेक्षित असताना उन्हामुळे खरेदीवर परिणाम होत आहे. रस्त्यावर बसून भाजीपाला, फळ विक्रेत्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. सावलीसाठी मोठ्या छत्रीचा आसरा घेतला जात असला तरी उन्हाच्या झळांमुळे मात्र अंकाची काहिली सहन करावा लागत आहे.