Dhurandhar : बॉलिवूडची छबी बदलणारा धुरन्धर

सह्याद्रीचा माथा ! भीषण अतिरेकी वास्तव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर
Dhurandhar : बॉलिवूडची छबी बदलणारा धुरन्धर
Dhurandhar : बॉलिवूडची छबी बदलणारा धुरन्धर
Published on
Updated on

नाशिक, डॉ. राहुल रनाळकर

बॉलिवूड हा शब्द उच्चारला की, आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर रंगीत गाणी, परदेशी लोकेशन्स, स्वप्नवत प्रेमकथा आणि भव्य सेट्स उभे राहतात. मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदी सिनेमाने हळूहळू ही चौकट मोडण्यास सुरुवात केली आहे. धुरन्धर हा त्याच प्रवासातील निर्णायक टप्पा म्हणावा लागेल. हा सिनेमा केवळ कथानक मांडत नाही, तर भारताने गेल्या तीन दशकांत भोगलेल्या भीषण अतिरेकी वास्तवाला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर ठामपणे उभे करतो.

धुरन्धर हा १९९९ चा कंदाहार विमान अपहरण, २००१ मधील संसदेवरील दहशतवादी हल्ला आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेला मुंबईवरील हल्ला या तीन घटनांच्या स्मृती जागवणारा सिनेमा आहे. या घटना केवळ भूतकाळातील नोंदी नाहीत, तर भारतीय लोकशाही, सुरक्षा व्यवस्था आणि राष्ट्रीय मानसिकतेवर खोलवर परिणाम करणारे आघात होते. विशेष म्हणजे मुंबई हल्ल्यादरम्यान अतिरेकी आणि त्यांचे पाकिस्तानी हॅन्डलर यांच्यात झालेले संभाषण जसेच्या तसे वापरण्याचे धाडस दिग्दर्शकाने दाखवले आहे. त्यामुळे धुरन्धर हा सिनेमा न राहता, एखाद्या 'न्यूज डॉक्युमेंटरी'चा अनुभव देतो.

आज दीड-दोन तासांत संपणाऱ्या फास्ट-कट सिनेमांच्या युगात धुरन्धर तब्बल साडेतीन तासांचा आहे, आणि हेच त्याचे मोठे सामर्थ्य आहे. उरीसारख्या यशस्वी सिनेमानंतर आदित्य धर यांनी पुन्हा एकदा लाँग-फॉर्म सिनेमावर विश्वास ठेवला. प्रेक्षक इतका वेळ कथेत गुंतून राहू शकतात, हा त्यांचा आत्मविश्वास कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे सिनेमा पाहताना 'आता कधी संपतो' अशी भावना क्षणभरही येत नाही. घटनांचा प्रवाह, प्रसंगांची मांडणी आणि कथानकाची पकड यामुळे सिनेमा स्वतःच्या वेळेचे भान विसरायला लावतो.

भारतीय समाजाची मोठी मर्यादा म्हणजे लोकस्मृती. मोठ्या राष्ट्रीय आपत्तीच्या घटनाही काळाच्या ओघात विस्मरणात जातात. धुरन्धर हीच विस्मृती छेदून काढतो. या तीन अतिरेकी घटनांच्या वेदना, त्यामागील कटकारस्थाने आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा पट हा सिनेमा उलगडतो. जेव्हा भारतात हे हल्ले होत होते, तेव्हा शत्रुराष्ट्रांत काय घडत होते, कोणत्या यंत्रणा सक्रिय होत्या, याचे वास्तववादी चित्रण सिनेमात दिसते. 'सय्यारा'सारखा सिनेमा पाहून भावुक होणाऱ्या पिढीसमोर धुरन्धरसारखा कठोर वास्तववादी सिनेमा मांडण्याचे आव्हान निर्माते आणि कलाकारांनी समर्थपणे पेलले आहे.

Dhurandhar : बॉलिवूडची छबी बदलणारा धुरन्धर
Nashik Politics: भुजबळ X दराडे बंधू, कोकाटे X भाजप; नाशिकच्या राजकारणातील बाहुबली कोण ठरणार?

कंदाहार विमान अपहरण प्रकरणात अतिरेक्यांशी वाटाघाटी करणाऱ्या अजित डोवाल यांची भूमिका आर. माधवननी साकारली आहे. ही भूमिका म्हणजे सिनेमाचा कणा आहे. माधवन यांनी अभिनयात कुठेही नाटकीपणा आणलेला नाही. संयत, थंड डोक्याने विचार करणारा आणि राष्ट्रहित सर्वोच्च मानणारा अधिकारी त्यांनी प्रभावीपणे उभा केला आहे. संपूर्ण सिनेमात सतत 'न्यूजी टच' जाणवत राहतो, ज्यामुळे सिनेमा अधिक वास्तववादी होत जातो.

अनेक सिनेमे तटस्थतेच्या नावाखाली धार बोथट करतात. धुरन्धर मात्र सत्य जसे आहे, तसे दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काही समीक्षकांनी याला 'प्रोपगंडा फिल्म' असे लेबल लावले. मात्र, प्रेक्षकांसाठी हे लेबल निरर्थक ठरते, हे भरगच्च थिएटर्स आणि हाउसफुल शोच स्पष्ट करतात. या सिनेमाची चॅप्टरवाइज, वेब-सिरीज स्टाइल रचना ही आणखी एक जमेची बाजू आहे. आजच्या जेन-झी पिढीची सवय लक्षात घेऊन कथनशैली जाणीवपूर्वक बदललेली दिसते.

Dhurandhar : बॉलिवूडची छबी बदलणारा धुरन्धर
Nashik News : युवा पिढी हीच नव्या भारताची शिल्पकार

कराचीच्या गल्लीबोळांमधील गँगवॉर, पाकिस्तानातील राजकारणाचा गुंडांशी असलेला संबंध आणि आयएसआयची अंतर्गत कार्यपद्धती यांचे चित्रण अतिशय प्रभावी आहे. हे सगळे पाहताना सिनेमा पाहतोय की, एखादी आंतरराष्ट्रीय तपास पत्रकारिता, असा प्रश्न पडतो.

कलाकारांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर अक्षय खन्ना हा या सिनेमाचा खरा धुरन्धर ठरतो. छावामधील औरंगजेबानंतर त्याचा अभिनयप्रवास एका वेगळ्याच उंचीवर गेला आहे. रणवीर सिंगसारखा स्टार हिरो असतानाही अक्षय खन्ना प्रेक्षकांच्या मनावर अधिक ठसा उमटवतो. यशाला वयाचे बंधन नसते, हे त्याने पुन्हा सिद्ध केले आहे. तो आता केवळ अभिनेता न राहता, बॉलिवूडचा एक आयकॉन होताना दिसतो.

रणवीर सिंगचेही काम प्रभावी आहे. सुरुवातीचा मसलमॅन लूक आणि नंतरचा शारीरिक बदल हे त्याच्या भूमिकेतील बारकावे दाखवतात. आयएसआय चीफच्या भूमिकेत अर्जुन रामपाल भाव खाऊन जातो. संजय दत्त, राकेश बेदी यांच्या भूमिका छोट्या असल्या, तरी परिणामकारक आहेत. विशेषतः राकेश बेदी यांनी साकारलेला पाकिस्तानी स्थानिक नेता अगदी जिवंत वाटतो.

गुप्तहेरांवरील सिनेमांमध्ये हेरगिरीचे जग अनेकदा ग्लॅमरस दाखवले जाते. मात्र, धुरन्धर हे ग्लॅमर झटकून टाकतो. हेरगिरी म्हणजे सततचा ताण, अनिश्चितता आणि मानसिक युद्ध कसे असते, हे सिनेमा ठळकपणे दाखवतो. कबिलायी गाण्याचा प्रसंग, त्यातील ठेका आणि अक्षय खन्नाची एन्ट्री हा सिनेमा लक्षात राहणारा क्षण ठरतो.

या सिनेमामुळे जागतिक पातळीवर 'नॅरेटिव्ह वॉर' सुरू झाल्याचे जाणवते. युद्धजन्य विषयांवर सिनेमे करून जागतिक मतप्रवाह घडवण्याची मक्तेदारी आजवर हॉलिवूडची होती. धुरन्धरने बॉलिवूडही या शर्यतीत उतरल्याचे स्पष्ट केले आहे. बॉलिवूड हे भारताचे सॉफ्ट पॉवर आहे, आणि हा सिनेमा त्या शक्तीचा प्रभावी वापर करतो.

बलूच समाजात या सिनेमाच्या झालेल्या प्रभावामुळे अक्षय खन्नाला बलूचिस्तानचा भावी पंतप्रधान होण्याच्या विनोदी ऑफर्स येतात. हे अतिशयोक्त वाटले, तरी सिनेमाचा परिणाम किती खोलवर झाला आहे, हे यातून नक्कीच अधोरेखित होते.

आजवर बॉलिवूडची ओळख मस्ती, रोमान्स आणि गाण्यांपुरती मर्यादित होती. धुरन्धर ही ओळख बदलणारा मैलाचा दगड ठरतो. 'हिंदुस्तान का सबसे बडा दुश्मन हिंदुस्तानीही है' हा संवाद केवळ सिनेमाचा नाही, तर आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. अक्षयकुमारने देशभक्तीप्रधान सिनेमांची पायाभरणी केली, पण त्या प्रवासाला वैचारिक, वास्तववादी आणि आंतरराष्ट्रीय उंची देण्याचे काम धुरन्धरने केले आहे. चित्रपटगृहात जेन-झीची मोठी उपस्थिती, हे या सिनेमाचे सर्वात मोठे यश आहे. भारतीय सुरक्षा दलांची ऑपरेशन्स, त्याग आणि रणनीती समजून घ्यायची असेल, तर धुरन्धर हा सिनेमा केवळ पाहायलाच नव्हे, तर अनुभवायलाही हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news