

नाशिक : अंजली राऊत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून भारतीय समाजपरिवर्तनाला नवी दिशा दिली. अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होत समता, स्वाभिमान, करुणा आणि विवेकनिष्ठ जीवनाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा या धम्मक्रांतीतून मिळाली. या परिवर्तनाचे प्रसाद् नाशिकसह महाराष्ट्रातील बौद्ध चळवळीत उमटले.
शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि हक्कांच्या संघर्षाच्या माध्यमातून या चळवळीने समाजाला नवी ओळख दिली असून, आज त्यांच्या कार्याला ७० वर्षे होऊनही समाजातील तरुण पिढीची शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत.
धम्मक्रांतीनंतर तरुणांनी केवळ धार्मिक परिवर्तनापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे व्यापक कार्य हाती घेतले. नाशिकमध्येही बौद्ध धम्माचा विचार रुजविण्यासोबतच शिक्षण, संघटन आणि सामाजिक जागृतीला महत्त्व मिळाले.
व्याख्याने, जयंती-उत्सव, धम्म परिष्दा, अभ्यासवर्ग आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून समता व बंधुतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची परंपरा विकसित झाली.
ग्रामीण भागातून शहरांकडे आलेल्या अनेक कुटुंबांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी समाजातील कार्यकर्त्यांनी वसतिगृहे, शैक्षणिक मदत आणि सामूहिक सहकार्याचे मार्ग स्वीकारले.
या प्रयत्नांमुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत झाली. नाशिकमधील आंबेडकरी चळवळीच्या वाटचालीत शिक्षण आणि सामाजिक स्वाभिमान हे महत्त्वाचे आधार राहिले आहेत. धम्म परिवर्तनाला बाबासाहेबांनी दिलेल्या शैक्षणिक दृष्टीकोनाची जोड मिळाली. १९४८ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्थांनी वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यास हातभार लावला.
मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय आणि छत्रपती संभाजीनगरमधील मिलिंद महाविद्यालय या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचे उदाहरणे ठरली आहेत. शिक्षणातून स्वावलंबन, सामाजिक जाणीव आणि हक्कांसाठी लढायची क्षमता निर्माण होऊ शकते, हा विश्वास समाजात दृढ झाला.
आरक्षण आणि घटनात्मक हक्कांचे महत्त्व कायम असताना गुणवत्तेपूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर प्रगती करण्याची जाणीवी तरुणांमध्ये वाढत आहे. त्याचबरोबर सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि संविधानिक मूल्यांवरील आव्हानांविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचे विचार पुढे नेणे म्हणजे केवळ स्मृतिदिन साजरी करणे नव्हे, तर त्यांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणार आणणे, ही जाणीव नव्या पिढीत रुजविण्याची गरज आहे.
धम्मक्रांतीने दिलेला समतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या मार्गांनी सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया पुढे नेणे, तसेच प्रज्ञा, शील आणि करुण्याच्या आधारे समाजात बंधुता निर्माण करणे आहे.
धम्मक्रांतीनंतर विवेकवादी विचारांचा प्रसार:
बाबासाहेबांनी स्वीकारलेला बौद्ध धर्म हा केवळ धार्मिक विधींचा मार्ग नसून नैतिकता, प्रज्ञा, करुणा आणि समतेवर आधारित जीवनदृष्टी आहे. जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि माणसामाणसांतील उच्च-नीचतेला नकार देणाऱ्या या विचारांनी समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवले. व्यक्तीचे मूल्य जन्मावर नव्हे, तर तिच्या गुणवत्तेवर आणि कर्तृत्वावर ठरावे, ही भूमिका धम्मचलवळीच्या केंद्रस्थानी राहिली आहे.
नव्या पिढीची स्पर्धा, वैचारिक बांधिलकी:
आजच्या बौद्ध आणि आंबेडकरी तरुणांसमोर शिक्षण, रोजगार आणि स्पर्धात्मक परीक्षांमधील आव्हाने आहेत. खाजगीकरणामुळे सरकारी नोकऱ्यांच्या संख्या बदलत असताना, अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून प्रशासकीय सेवांसह विविध क्षेत्रांत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजाच्या सहकार्यातून चालणारी अभ्यासिका, मार्गदर्शन केंद्र, वाचनालये आणि शैक्षणिक उपक्रम या प्रयत्नांना बळ देत आहेत.
डॉ. आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार केला. धम्मक्रांतीनंतर समाज अनिष्ट रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धांच्या जोखडातून बाहेर पडू लागला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे या समाजसुधारकांच्या विचारारांचा समाजाने स्वीकार केला. या वैचारिक परिवर्तनामुळे आंबेडकरी समाजाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. या परिवर्तनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे.
— गंगाधर अहिर, कवी व साहित्यिक्स, नाशिक