

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, यावर राज्यभरात चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (दि. ७) दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा तयारीची उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत शहरातील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था आणि सिंहस्थ पूर्व विकासकामांचा मंद वेग यावर मुख्यमंत्र्यांकडून थेट जाब विचारला जाण्याची शक्यता असल्यामुळे महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.
शासनाच्या नगर विकास विभागामार्फत मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहामध्ये आयोजित या अतितत्काळ बैठकीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, नाशिकचे विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच नाशिक महापालिका आयुक्त यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, नागरिकांचा तीव्र संताप आणि विकासकामांवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह यामुळे प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमुळे अधिकाऱ्यांची अहवाल व माहिती सादर करण्याची लगबग सुरू आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शहरातील खड्डे, कन्स्ट्रक्शन टीडीआर आणि इतर नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी होणारी महापालिकेची विशेष महासभा पुढे ढकलण्यात आली असून ती आता शनिवारी (दि. ८) दुपारी १२ वाजता होणार आहे.
शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीनंतर नाशिकमधील खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी विशेष निधी, रस्त्यांची दुरुस्ती आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत विकासकामांना गती देण्याबाबत महत्त्वाचे आणि ठोस निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेतील 'स्टार रेट' प्रकरणावरून भाजपची चांगलीच कोंडी झाली असून, या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्तेकामांना स्टार रेट लागू केल्यास महापालिकेवर ३० ते ४० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी होत असलेल्या बैठकीत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.