

सटाणा (नाशिक ) : जनसेवा, परोपकार आणि सद्वर्तनातून शासकीय सेवेत असताना थेट देवपणाला पोहोचलेले संत शिरोमणी श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या 134 व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.15) पहाटे सफला एकादशीच्या मुहूर्तावर महापूजा झाली. पहाटे चारला ब्रह्ममुहूर्तावर महापूजा, अभिषेक व आरतीप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते. यात्रोत्सवास सुरुवात झाली असून, दुपारून पारंपरिक रथ मिरवणूक निघाल्यानंतर आगामी पंधरा दिवस यात्रेची धूम चालणार आहे.
मंदिर परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई, सडा-रांगोळ्या तसेच सनई चौघडे व मंगलवाद्याच्या सुमधुर निनादात ब्रह्मवृंदांच्या वेद मंत्रोच्चार व भजनाच्या स्वरात महापूजा झाली. तहसीलदार कैलास चावडे व प्रतिभा चावडे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड व अरुणा बागड, नगर परिषद मुख्याधिकारी ज्योती भगत व स्वप्नील पाटील, ट्रस्टी सुरेश खैरनार दाम्पत्य यांनी महापूजा केली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानंतर सर्व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महापूजेनंतर देवमामलेदार यशवंतराव महाराज मित्रमंडळाच्या वतीने फराळाचे तसेच साई मंदिर भक्त परिवाराच्या वतीने दुधाचे वाटप करण्यात आले.
मंदिरातील मुख्य कार्यक्रमासोबतच तहसीलदार कार्यालयात देवमामलेदारांच्या तत्कालीन खुर्चीचीही विधिवत पूजा करण्यात आली. पोलिस ठाणे आवारातील देवमामलेदार मंदिरात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, सुजाता राऊत व माजी नगरसेवक किशोर कदम, भारती कदम यांच्या हस्ते पूजा झाली. यात्रोत्सवानिमित्ताने संपूर्ण शहरभरातच भक्तिमय वातावरण तयार झाले असून, दुपारून पारंपरिक रथ मिरवणूक काढण्यात आली. आगामी पंधरा दिवस शहरातील आरम नदी परिसरात यात्रा भरणार असून, त्यासाठी लाखो भाविकांची हजेरी लागणार आहे.त्यानिमित्ताने चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन आठवड्यांच्या यात्रोत्सवात कसमादेसह उत्तर महाराष्ट्रातील भाविक हजेरी लावतात. या काळात येथील व्यापार उद्योगाला चालना मिळते. अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात बळकटी मिळते. यानिमित्त येथील कंदी पेढा सर्वदूर पोहोचतो.