

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
शहरात शेकडो वर्षांपासून शिवकालीन टेकड्या असून, येथील खंडोबा महाराजांचे मंदिर अतिप्राचीन तसेच जागृत देवस्थान मानले जाते. या ठिकाणी विविध सामाजिक संघटना, दानशूर मंडळी व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून अत्यावश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असताना काही विघ्नसंतोषी लोकांच्या गैरकृत्यांमुळे खंडोबा टेकडीचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
टेकडीवरील पाण्याचे पाइप तोडण्याचे प्रकार समोर आले असून, लावलेली झाडेदेखील उपटून फेकले जात आहेत. तसेच प्रेमीयुगुलांकडून टेकडीचे पावित्र्य भंग केले जात असल्याचे प्रकारही निदर्शनास येत आहे.
हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनासह कॅन्टोन्मेंटने लक्ष देत परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांचे दुर्लक्ष, निर्भया पथकाची वानवा, पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष सध्या गंभीर विषय झालेला आहे.
खंडोबा टेकडी परिसरात प्रेमीयुगुलांच्या गर्दीवर कोणाचेही लक्ष वा नियंत्रण नाही. शालेय गणवेशातच मुले-मुली मंदिर परिसरात एकटे फिरताना आढळतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांसमोर प्रेमीयुगुलांकडून अश्लील चाळे सुरू असतात. चार वर्षांपूर्वी निर्भया पथकाने या ठिकाणी अनेकांवर कारवाई केली होती. मात्र, आता ही कारवाई पूर्णपणे थंडावली आहे.
पोलिस बंदोबस्त गरजेचा
पोलिस आयुक्तांनी सुरू केलेले मिशन ऑलआउट, नाकाबंदी हे उपक्रम राबविण्यासह महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून परिसरातील तडीपार गुंडांवर कारवाई केली पाहिजे तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही लावून पुन्हा निर्भया पथकाची गस्त सुरू करण्याचीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.