

देवळा पाच कंदील चौकात विंचूर प्रकाशा महामार्गाच्या कामाला सुरुवात व्हावी या मागणीसाठी राव मंडळाकडून करण्यात आलेली सत्यनारायण महापूजा
Devala Road Issue
देवळा : विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाच्या देवळा शहरातील कामास गेल्या दोन वर्षांपासून गती न मिळाल्याने प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, वाहन चालक व पादचारी यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते या कामाची सुरुवात लवकर व्हावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकामी देवळा येथील राव मंडळाच्या वतीने देवळा पाच कंदील चौकात भर रस्त्यावर सत्यनारायण पूजन करून अभिनव आंदोलन करण्यात आले.
सटाणा ते मंगरूळ राष्ट्रीय महामार्गाला केंद्र शासनाकडून 37 कि.मी च्या कामासाठी 428 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, गेल्या तीन वर्षांपासून सदरचे काम सुरू आहे. अनेक अडथळे पार करत आतापर्यंत 29 कि.मी चे काम जवळपास पूर्ण होत आले असून, उर्वरित 8 कि.मी मध्ये देवळा ते लोहोणेर हा भाग येतो त्यात गुंजाळनगर ते देवळा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनांचे अक्षरशः खिळखिळे होतात तर दुचाकी स्वरांना रोजच्या प्रवासाने पाठीच्या मणक्याचे आजार जडले आहेत.
दोन वर्षात विविध संघटनानी निवेदने देऊन रस्ता दुरुस्ती ची मागणी केली त्यावेळी संबंधित ठेकेदाराकडून माती मिश्रीत मुरूम टाकून मलम पट्टी च्या ऐवजी मुरूम पट्टी केल्याने प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरून रस्त्या लगतचे व्यापारी व नागरिकांना धुळीचा त्रास सहन करून घसा व डोळ्याचे विकार जडले आहेत तर अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात धुळीमुळे खाद्य पदार्थचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच पाऊस पडल्याने संपूर्ण चिखल झाला असून, यामुळे विद्यार्थी व दुचाकी स्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या सर्व बाबी लक्षात घेता संबंधित ठेकेदाराकडून देवळा शहरातील अतिक्रमण धारकांचा प्रश्न मोठा असून, टपरी धारक अद्याप संभ्रमात आहेत. राष्ट्रीय महामार्गाकडून आद्याप कुठल्याही प्रकारचा लाईन आउट न झाल्याने सदर चा संभ्रम हा कायम असून, रस्ता कसा जाणार व काम कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
देवळा शहरातील समस्या बाबत राव मंडळाचे स्वप्नील आहेर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून समस्या मांडत असतात व लोकप्रतिनिधी सह अधिकाऱ्यांना लक्ष केंद्रित करतात त्यामुळे शहरात नेहमी एक चर्चेचा विषय असतो परंतु या वेळी त्यांनी भर रस्त्यात सत्यनारायण पूजन करून रस्त्याच्या कामाचा मुहूर्त शोधावा यासाठी अभिनव आंदोलना द्वारे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. याची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी सचिन सूर्यवंशी, बंडू आहेर, किरण आहेर, दत्तात्रय आहेर, अशोक आहेर, शाम अहिरराव, मनोज गुजरे, विलास माळी हे उपस्थित होते ते पौरोहित्य राहुल वाघमारे यांनी केले.