

देवळा / खामखेडा : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील खामखेडा येथे जुन्या विहिरीच्या खोदकामादरम्यान सोमवारी (दि. ६) दुपारी ३.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. विहिरीतील पाणी उपसण्यासाठी बसविलेल्या मोटारीचा वायर रोप अचानक तुटल्याने अवजड मोटार थेट विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत राजस्थानमधील मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला.
खामखेडा येथील गट क्रमांक २२४ मधील शेतकरी रमेश शिवाजी शेवाळे यांच्या शेतातील जुन्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. हे काम राजस्थान-मधील मजुरांकडून केले जात होते. सोमवारी दुपारी तीन मजूर विहिरीत उतरून खोदकाम करीत असताना, विहिरीतील पाणी उपसण्यासाठी वर बसविण्यात आलेली मोटार वायर रोपच्या साहाय्याने कार्यरत होती.
मात्र, अचानक वायर रोप तुटल्याने मोटार थेट विहिरीत कोसळून खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडली. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघातात चेतन लाडूराम मेघवंशी (३०, रा. देवीपुरा, ता. मसुदा, जि. ब्यावर, राजस्थान) यांच्या डोक्यावर मोटार पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत सुरेश बालूराम हरिजन हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर प्रथम उपजिल्हा रुग्णालय, कळवण येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत चेतन मेघवंशी यांचे देवळा ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले.
त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून, अंत्यसंस्कारासाठी राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आला. या प्रकरणी शेतकरी रमेश शिवाजी शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक विनय देवरे व पोलिस शिपाई सुरेश कोरडे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
नवीन किंवा जुन्या विहिरीचे खोदकाम करताना संबंधित ठेकेदारांनी मजुरांची काळजी घेतली पाहिजे. काम करताना अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडल्यास ठेकेदाराने आपली जबाबदारी स्वीकारून त्या कुटुंबातील सदस्यांना अर्थिक मदत करावी.
कुबेर जाधव, प्रगतशील शेतकरी, विठेवाडी