निळे गावाजवळ दरडीवरून कोसळून गवा रेडा गंभीर जखमी

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी झालेले खोदकाम गव्याच्या जीवावर, जखमी गव्याला कोल्हापूरला हलविले
निळे गावाजवळ दरडीवरून कोसळून गवा रेडा गंभीर जखमी
Published on
Updated on

सरूड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील निळे गावानजीक महामार्गाच्या विस्तारित कामाच्या ठिकाणी दरडीवरून सुमारे ३० फूट उंचीवरून खाली कोसळून गवा रेडा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेतील या गव्याला उपचारांसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविले आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यासह बाजूचे ऊत्खनन करण्यात येत आहे. यामध्ये तालुक्याच्या पश्चिम भागात जंगली प्राण्यांचे भ्रमण क्षेत्र बाधित झाले आहे. दरम्यान काल रात्री उशिरा रस्ता पार करत असताना एक गवा रेडा खोदकाम झालेल्या रस्त्याकडच्या खोलीचा अंदाज न आल्याने जवळपास ३० फूट खोल दरडीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. गव्याच्या पाठीचा मणका व पायाचे हाड मोडून गंभीर दुखापत झालेल्या आहेत. यामुळे गव्याला जागेवरून कोणतीही शारिरीक हालचाल करता येत नसल्याने रात्रीपासून त्याच ठिकाणी तो पडून राहिला होता.

दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरी दौऱ्यावर निघाले असताना सदर घटनास्थळी थांबून त्यांनी घडलेल्या घटनेची पाहणी केली. गंभीर जखमी गव्याची चिंताजनक परिस्थिती पहाता त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत तातडीने हालचाली करण्यासाठी सुचना दिल्या. शाहूवाडीचे शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचून जखमी गव्यावर प्राथमिक उपचार केले असून कोल्हापूर येथून विशेष वैद्यकीय पथक येऊन गव्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला कोल्हापूर येथे हलविले जाणार असल्याची माहिती मलकापूर परीक्षेत्र वनाधिकारी उज्ज्वला मगदूम यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित ठेकेदारांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे गव्याच्या जीवावर बेतणारी घटना घडल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. प्रस्तावित कामाच्या ठिकाणी रस्त्याशेजारी ३० फूट खोदकाम केले असून प्रभावी उपाय म्हणून कुठेही पुर्ण सरंक्षक कठडे न उभारल्याने ही घटना घडलेली आहे, असेही राजू शेट्टी यांनी वनविभागासह राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कामावर बोट ठेवले आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news