

नाशिक : जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांतच डेंग्यूबाधितांचा आकडा ८१ वर पोहोचला आहे. जुलैत या आजाराचे ८४ रुग्ण आढळले होते. डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाने मोहीम तीव्र केली असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सहाही विभागांत घरोघरी भेटी देऊन तपासणी केली जात आहे.
पावसामुळे यंदा मे महिन्यापासूनच डेंग्यूचा आलेख चढता राहिला आहे. घर परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये डेंग्यू डासांची पैदास होत असल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. मे महिन्यात अवघे १७ रुग्ण आढळले होते. पाठोपाठ जूनमध्ये २५ रुग्ण आढळले होते. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. जुलैत रुग्णसंख्या ८४ वर जाऊन पोहोचली आहे. तर ऑगस्टमध्ये दोन आठवड्यांतच ८१ डेंग्यूबाधित रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचे ३०३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नाशिकरोड, सिडको, सातपूर या विभागांत डेंग्यूचा सर्वाधिक उपद्रव पाहायला मिळत आहे. डेंग्यूच्या अळ्या तपासण्यासाठी सहा विभागांत मोहीम हाती घेण्यात आली असून, दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोशिरे यांनी दिली.
महापालिकेच्या मलेरिया विभागाच्या पथकांमार्फत नवीन बांधकामे, शासकीय कार्यालये तसेच नागरिकांच्या घरांना भेटी देण्यात आल्यात. या तपासणीत जवळपास २ लाख ६ हजार ११५ घरांना भेटी देण्यात आल्या. त्यात १९५१ ठिकाणी पाणीसाठे आढळून आले असून, त्यापैकी १४३१ ठिकाणी डास उत्पत्ती करणाऱ्या अळ्या आढळून आल्या आहेत. तसेच २३३ जणांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक डेंग्यूच्या अळ्या या नाशिकरोड, सिडको आणि सातपूर या ठिकाणी आढळून आल्या आहेत.
जानेवारी - ३७
फेब्रुवारीत - ३२
मार्च - २१
एप्रिल- १५
मे - १७
जून - २५
जुलै - ८४
ऑगस्ट - ८१