

नाशिक : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईचे संकेत असतानाच इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईतील भेटीप्रसंगी जाब विचारल्याची माहिती आहे. आमदार खोसकर यांची आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी धोक्यात आल्याने त्यांनी मुंबईत तळ ठोकून पटोले यांची भेट घेत स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. (Indication of action against MLAs who cross-voted in Legislative Council elections)
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यात क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रॉस वोटिंगचा आरोप असलेल्या सात आमदारांमध्ये चलबिचल झाली आहे. उमेदवारी मिळण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी इगतपुरीचे आ. खोसकर यांनी मुंबईतच तळ ठोकले आहे. खोसकर यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांची भेट घेत त्यांची बाजू मांडली. बुधवारी दिवसभर त्यांची भेट होऊ न शकल्याने गुरुवारीदेखील खोसकर यांनी मुंबईत थांबून पटोले यांची भेट घेतली. पटोले यांनी शिष्टमंडळासमोर, खोसकर यांना जाब विचारल्याचे समजते. त्यानंतर पुन्हा अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. खोसकर यांनी सांगितले की, मी माझी बाजू पटोले यांच्याकडे मांडत क्रॉस वोटिंग केले नसल्याचे सांगितले. तसेच पटोले यांनीही माझे म्हणणे ऐकून घेत, उमेदवारी कापण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. तसेच जिल्हयातील इतर मतदारसंघांबाबतही चर्चा झाल्याचा दावा खोसकर यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत भेट झाली असून, सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी माझी बाजू ऐकली असून, आगामी निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली असून, पक्षाच्या आदेशानुसार काम करणार.
हिरामण खोसकर, आमदार