

नाशिक : विधान परिषद सदस्य निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा फटका जिल्ह्यातील त्र्यंबक-इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना बसणार आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पाच जणांवर कारवाई करणार असल्याचे हायकमांडने ठरवले असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आमदार खोसकर हे मुंबईत तळ ठोकून असून गुरुवारी (दि.८) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषद सदस्य निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या सात आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याच्या चर्चा महिनाभरापासून सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत मुंबईत स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाचा व्हीप मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेसाठी गेल्या महिन्यात मतदान पार पडले होते. यामध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षादेश झुगारून मतदान केले होते. त्याचा परिणाम पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्यामध्ये झाला होता. एकीकडे सत्ताधारी पक्षाला विरोध करायचा आणि वेळेवर सत्ताधाऱ्यांनाच मतदान करण्याचा काँग्रेसचा डाव लक्षात आल्याने पक्षातील राष्ट्रीय नेत्यांनी हस्तक्षेप करत संबंधितांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित केले होते. याबाबतीत अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली येथील बैठकीहून परतल्यानंतर माध्यमांना याबाबत माहिती दिली.
काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. तळागाळातील कार्यकर्ते ज्यांनी कायम काँग्रेसचा विचार केला त्यांना आता प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांचा सन्मान आता आम्ही करणार आहोत, काँग्रेस हायकमांडने ही माहिती दिली आहे. कोणाला आम्ही अभय दिलेले नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सातपैकी पाच आमदारांवर कारवाई अटळ असल्याचे पक्षाने म्हटले आहे.