

जळगाव/नाशिक : पुढारी वृत्तसेवा
क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दीपमाला काळे, आमदार राजूमामा भोळे, नितीन लड्डा, सुनील झवर, क्रेडाई राज्य उपाध्यक्ष अनिश शहा, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानद सचिव तुषार संकलेचा, उपाध्यक्ष व प्रॉपर्टी एक्स्पो हेड मनोज खिवसरा, उपाध्यक्ष अनिल आहेर, समन्वयक सागर शहा, सहसमन्वयक अनंत ठाकरे, आयपीपी कृणाल पाटील, माजी अध्यक्ष उमेश वानखेडे, सतीश मोरे, ऋषभजैन, सुशील बागड आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री महाजन यांनी, मी नाशिककरच असल्याचे सांगत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात विकासात्मक कामांचा आढावा घेतला. ७ ते ९ मार्चदरम्यान जळगावमधील सागर पार्क ग्राउंड येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गौरव ठक्कर यांनी दिली. ठक्कर म्हणाले, हवेची गुणवत्ता आणि पाण्याची मुबलकता याचे वरदान लाभलेल्या नाशिकमधील हवामान अनेकांना आकर्षित करते.
तसेच मुंबई, पुण्यापासून कमी अंतर आणि जगभरातील सर्व प्रमुख शहरांसोबत वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिकमधील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
चेन्नई-सुरत महामार्ग, नाशिक जवळ विकसित होत असलेले वाढवण बंदर यासोबतच समृद्धी महामार्ग हा खानदेश एक्स्प्रेसवेद्वारे जळगावला सहा पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार असून, प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एक्स्पो समन्वयक सागर शाह यांनी प्रास्ताविक केले. तुषार संकलेचा यांनी आभार मानले. प्रदर्शनाचे प्रायोजक म्हणून अर्बन साइटस व सहप्रायोजक म्हणून क्रिश ग्रुप व ललित संगठा यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
प्रदर्शनात आघाडीचे विकसक सहभागी
जळगाव येथे आयोजित या प्रदर्शनात नाशिकचे अनेक आघाडीचे विकसक सहभागी झाले असून, फ्लॅट्स, प्लॉट्स, फार्म हाउस, शॉप्स, ऑफिसेस यांचे असंख्य पर्याय प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्रदर्शनाचा लेआउट व व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असून, ग्राहकांच्या सोयीसाठी पूर्ण प्रदर्शन वातानुकूलित करण्यात आले आहे. तीनदिवसीय प्रॉपर्टी एक्सपोमध्ये नाशिकसोबतच इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या भागांतील अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.