Nashik Vehicle LPG Price Hike | नाशिकमध्ये इंधनाचा भडका! वाहनांमधील एलपीजी 14 रुपयांनी महागला; युद्धाचा फटका थेट खिशाला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतींप्रमाणेच वाहनांमधील एलपीजी तब्बल १४.२२ रुपयांनी महागला आहे. इराण-अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे एलपीजीच्या किमतींचा भडका उडाला असून, सीएनजीच्या किमतीदेखील वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इराण-इस्रायल युद्ध पेटल्याने, देशातील एलपीजीच्या किमती वाढविण्यात आल्या.
घरगुती गॅसची किंमत ६० रुपयांनी वाढली असून, -व्यावसायिक गॅसची किंमत ९० रुपयांनी वाढली आहे. तसेच मागील दोन दिवसांत वाहनांमधील - एलपीजीदेखील १४.२२ रुपयांनी महाग झाला आहे.
नाशिकमध्ये वाहनांमधील एलपीजीचे दर ५३.७३ रुपये इतके होते. मात्र, दोन दिवसांत दरात तब्बल १४.२२ रुपयांची वाढ झाल्याने, दर थेट ६७.९५ रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, इराण-इस्रायल, अमेरिका युद्धाचा भडका वाढतच असल्याने, पुढील काळात दराचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.
वाहनांमधील एलपीजी वाढल्याने वाहनधारकांकडून विशेषतः रिक्षाचालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
सीएनजीचे दरही वाढणार?
एलपीजी प्रमाणे सीएनजीचे देखील दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकमध्ये सीएनजीचा दर ९३ रुपये ६५ पैसे इतका आहे. दरम्यान, सीएनजी प्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या किमती देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरांचा होत असलेला भडका वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

