POP Ganesha Idol Solution | 'नवीन मूर्तिकार घडले तरच पीओपीचा प्रश्न सुटेल'; पेडण्याचे मूर्तिकार सूर्यकांत पाडजींचा महत्त्वाचा सल्ला

POP Ganesha Idol Solution | मूर्तिकार सूर्यकांत पाडजी : पार्सेतील पारंपरिक चित्रशाळेत दरवर्षी 200 हून अधिक चिकणमातीच्या गणेशमूर्ती
POP Ganesha Idol Solution
POP Ganesha Idol Solution
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
गणेशमूर्ती निर्मितीची पारंपरिक कला टिकवायची असेल, चिकणमातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींची संख्या वाढवायची असेल आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ( पीओपी ) मूर्तीचे बाजारातील प्रमाण कमी करायचे असेल, तर त्यासाठी नव्या पिढीतील कलाकार घडवणे, त्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे आणि शालेय स्तरापासून मूर्तिकलेची आवड निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत पार्से-मधलावाडा येथील पारंपरिक मूर्तिकार सूर्यकांत पाडजी यांनी व्यक्त केले.

POP Ganesha Idol Solution
NASAKA Sugar Factory | नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा अडचणीत; शेतकरी-कामगारांसाठी खा. राजाभाऊ वाजे मैदानात

वडिलांकडून वारशाने मिळालेली गणेशमूर्ती निर्मितीची चित्रशाळा सूर्यकांत पाडजी यांनी आजही जपली आहे. पूर्वी त्यांच्या वडिलांच्या काळात वर्षाला सुमारे ७० ते ८० गणेशमूर्ती तयार केल्या जात. आज त्याच चित्रशाळेत दरवर्षी सुमारे २०० हून अधिक घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मूर्ती तयार केल्या जातात. या मूर्तींसाठी प्रामुख्याने पारंपरिक चिकणमातीचा वापर केला जातो.
गोव्याच्या बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती येण्यामागे अनेक कारणे असल्याचे पाडजी यांनी सांगितले. चिकणमातीच्या मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळत नाही. पारंपरिक मूर्तिकारांची संख्या कमी होत आहे आणि त्याच वेगाने नवीन कलाकार तयार होत नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी मूर्तींची मागणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान स्थानिक मूर्तिकारांसमोर उभे राहते.

गोव्यातील प्रत्येक गणेशभक्ताला स्थानिक पातळीवर तयार झालेली मातीची मूर्ती वेळेत उपलब्ध करून देण्याची क्षमता आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. स्थानिक मूर्तिकारांकडून पुरेशा प्रमाणात मूर्ती उपलब्ध झाल्या तर बाहेरून येणाऱ्या पीओपीच्या मूर्तींची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे पाडजी म्हणाले.
त्यासाठी सरकारने केवळ पीओपीवर निर्बंध घालण्याऐवजी 'नवीन मूर्तिकार घडवा' ही दीर्घकालीन मोहीम हाती घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. अनुभवी मूर्तिकारांच्या माध्यमातून युवकांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करावीत. नव्या कलाकारांना माती, आवश्यक साधने, कार्यशाळेची जागा आणि आर्थिक प्रोत्साहन उपलब्ध करून दिल्यास युवक या पारंपरिक व्यवसायाकडे वळू शकतील, असे त्यांचे मत आहे.

शाळांमधूनच मूर्तिकलेची बीजे रुजवा

शालेय स्तरावरच त्याची सुरुवात करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना पाडजी यांनी केली. हायस्कूलमध्ये विविध विषयांसाठी जसे शिक्षक व प्रशिक्षक असतात, त्याच धर्तीवर अनुभवी मूर्तिकारांना शाळांमध्ये निमंत्रित करून विद्यार्थ्यांना माती हाताळणे, मूर्तीचा साचा घडवणे, प्रमाणबद्ध रचना, रंगकाम आणि पर्यावरणपूरक मूर्तीनिर्मिती याचे प्राथमिक प्रशिक्षण देता येईल.

अशा उपक्रमांमधून प्रत्येक विद्यार्थी व्यावसायिक मूर्तिकार होईलच असे नाही; मात्र त्यातून कलेविषयी आवड असलेले अनेक विद्यार्थी पुढे येतील. त्यातील काही जण ही कला व्यवसाय म्हणून स्वीकारतील आणि गोव्याच्या गणेशोत्सवाशी जोडलेली मातीच्या मूर्तींची परंपराही टिकून राहील, असे त्यांनी सांगितले.

चिकणमाती भविष्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल का, हा प्रश्नही गंभीर असल्याचे पाडजी यांनी नमूद केले. त्यामुळे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून शाडू मातीचा अधिक व्यापक वापर करण्याच्या शक्यतेवर विचार होऊ शकतो. मातीची उपलब्धता, वाहतूक आणि किंमत या बाबतीतही सरकारने मूर्तिकारांना मदत केली तर स्थानिक उत्पादनाला मोठा हातभार लागू शकतो.
सूर्यकांत पाडजी यांच्या चित्रशाळेत गणेशोत्सवाच्या काळात त्यांचा मुलगा, भाऊ, नातेवाईक, शेजारी तसेच मूर्तिकलेची आवड असलेले हौशी कलाकारही सहभागी होतात. त्यामुळे ही चित्रशाळा केवळ मूर्ती तयार करण्याचे ठिकाण न राहता नव्या कलाकारांना प्रत्यक्ष कामातून मूर्तिकला शिकण्याची जागाही बनली आहे.

नव्या पिढीतील शुभम पाडजी यांनीही वडिलांकडून ही पारंपरिक कला आत्मसात केली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून आपण या कलेत रमलो असल्याचे त्यांनी सांगितले. नोकरी किंवा व्यवसाय सांभाळूनही मूर्तिकलेसाठी वेळ देता येतो आणि योग्य कौशल्य विकसित केल्यास ही कला रोजगाराचे साधनही ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

चिकणमाती, पीओपी मिश्रणाचे प्रात्यक्षिक दाखवावे

पीओपी आणि माती यांच्या मिश्रणातून गणेशमूर्ती तयार करण्याच्या संकल्पनेबाबत पाडजी यांनी प्रश्न उपस्थित केला. 'चिकणमाती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस प्रत्यक्षात कशा प्रकारे एकत्र मिसळून टिकाऊ मूर्ती तयार करता येते, याचे तज्ज्ञांनी मूर्तिकारांसमोर प्रात्यक्षिक करून दाखवावे,' अशी भूमिका त्यांनी मांडली. अशा निर्णयांबाबत पारंपरिक मूर्तिकारांना तांत्रिक माहिती आणि स्पष्ट मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

POP Ganesha Idol Solution
NASAKA Sugar Factory | नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा अडचणीत; शेतकरी-कामगारांसाठी खा. राजाभाऊ वाजे मैदानात

अनुदानवाढीचे स्वागत

पारंपरिक मातीच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचाही पाडजी यांनी उल्लेख केला. पूर्वी प्रति मूर्ती १०० रुपये अनुदान मिळत होते. त्यात वाढ होऊन प्रति मूर्ती २०० रुपये मदत मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि हस्तकला क्षेत्रातून मूर्तिकारांना अधिक प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

निर्बंधांपेक्षा कलाकार निर्मितीचा दीर्घकालीन मार्ग

पीओपीच्या गणेशमूर्तींचा प्रश्न हा केवळ बंदी किंवा नियमांचा विषय नसून स्थानिक उत्पादनक्षमता, कच्च्या मालाची उपलब्धता, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि नव्या पिढीचा सहभाग यांच्याशी जोडलेला असल्याचे पाडजी यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. राज्यातील अनुभवी मूर्तिकारांचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार, शाळा आणि सांस्कृतिक संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास प्रत्येक गावात नवीन मूर्तिकारांची पिढी उभी राहू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news