

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणातील संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे चर्चेत आलेले छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या कारागृहातील मुक्कामात पुन्हा सहा दिवसांची वाढ झाली आहे.
मंगळवारी पटेल यांना नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑगस्टपर्यंत वाढ केली. त्यामुळे त्यांना तत्काळ दिलासा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
टीसीएस धर्मांतर प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखांना पटेल वारंवार न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात वॉरंट बजावण्यात आले होते. या वॉरंटनुसार नाशिक पोलिसांनी मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मंगळवारी कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
पटेल यांना जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच प्रकरणातील फिर्यादी महिलेचे म्हणणे अद्याप नोंदविले गेले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयाने त्यांची कोठडी कायम ठेवत पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. या सुनावणीवेळी फिर्यादी महिलेचे म्हणणे नोंदविले जाण्याची शक्यता आहे.
त्यानंतर पटेल यांच्या जामीन अर्जावर तसेच पुढील कोठडीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात नाशिक पोलिसांनी पटेल यांची यापूर्वी सहा वेळा चौकशी केली आहे. मात्र, न्यायालयीन सुनावणीला गैरहजर राहणे त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, वॉरंटनंतर झालेल्या अटकेमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि अत्याचाराच्या आरोपांमुळे गाजलेल्या प्रकरणातील संशयित दानिश शेख याच्या जामीन अर्जावर १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. धर्मांतराचा प्रयत्न तसेच अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दानिश शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. इतर गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळाला असला, तरी या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी त्याने नाशिकरोड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
या अर्जावर मतीन पटेल यांच्या प्रकरणासोबतच १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याने त्या दिवसाच्या न्यायालयीन कामकाजाकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये इतर सहा आरोपींना यापूर्वी जामीन मिळालेला आहे. त्यामुळे दानिश शेख याला या प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपांनी या प्रकरणाची राज्यभरातच नव्हे, तर देशभरात चर्चा झाली होती.