

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योंचे नाशिक येथे आगमन झाले असून शनिवार (दि.22) रोजी त्यांनी शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला. त्यानंतर त्यांनी 23 मार्च शहिद दिनानिमित्त आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते. त्यानंतर येथील धार्मिक ठिकाण त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी दर्शन घेतले. सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार प्रशासकीय यंत्रणा तयारीला लागली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याला ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री पदाची सुत्र स्विकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. या दौऱ्यावेळी ते नाशिक येथील काही ठिकाणांना भेटी देखील देणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोवळे वस्त्र परिधान करून त्र्यंबकेश्वर येथे गर्भगृहात अभिषेक पूजा केली. मंदिर प्रांगणात साधू महंतांची भेट घेत कुंभमेळाबाबत चर्चा केली. कुशावर्तावर जाऊन तेथील माहिती घेतली. याप्रसंगी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते.त्र्यंबकेश्वर, नाशिक