

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात जन्मल्यानंतर शासकीय दप्तरी लिंगाच्या चुकीच्या नोंदीवरून झालेल्या वादातील चिमुकलीचा उपचारादरम्यान आठवडाभराने मृत्यू झाला. या चिमुकलीस जन्मत: पोटाचा आजार होता. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र शस्त्रक्रियेनंतर चिमुकलीची प्रकृती गंभीर होती. अखेर उपचारादरम्यान, बुधवारी (दि. २३) सकाळी तिची प्राणज्योत मालवली. शोकाकुल वातावरणात चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदुर गाव येथील एका महिलेची रविवारी (दि. १३) जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुती होऊन मुलीस जन्म दिला. मात्र तेथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे शासकीय कागदोपत्री मुलीऐवजी मुलगा अशी नोंद झाली. त्यामुळे नातलगांनी याचा जाब विचारल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालानुसार जन्मास मुलगी आली होती हे स्पष्ट झाले. तसेच अहवालावरून एनआरएचएमच्या दोन डॉक्टर व तीन परिचारिकांना सेवेतून काढण्यात आले. दरम्यान, या मुलीस जन्म:त पोटाचा आजार होता. त्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. चौकशी समितीचा अहवाल तयार होत असतानाच मुलीवर खासगी रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर मुलीने सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र काही वेळानंतर तिची प्रकृती गंभीर झाली. सात दिवसांपासून तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अयशस्वी ठरली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे व सहकाऱ्यांनी चिमुरडीच्या कुटूंबियांचे सात्वंन करीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.