Citylink Bus Stop : समस्यांचे सिटीलिंक बसथांबे

Pudhari Special Ground Report | सिटीलिंकच्या बसथांब्यांची दुरवस्था, नागरिकांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष
नाशिक
Citylink Bus Stop : समस्यांचे सिटीलिंक बसथांबे( छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : प्रफुल्ल पवार

स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना आरामदायी व प्रदूषणमुक्त सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिटीलिंकच्या थांब्यांचा अवघ्या पाच वर्षांतच बोजवारा उडाला आहे. अनेक थांब्यांची परिस्थिती बकाल झाली आहे. याकडे सिटीलिंक प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून रस्त्यावर बसची वाट पाहावी लागते.

शहरात सिटीलिंक बससेवा सुरू करताना प्रवाशांसाठी आरामदाई, सुरक्षित आणि आधुनिक पण मागील बस व्यवस्थेपेक्षा चांगल्या सुविधा व सुशोभित बसथांबे उभारण्याचे स्वप्न दाखविण्यात आले होते. तब्बल पाच वर्षांत प्रत्यक्षात पाहिले, तर नाशिकमधील अनेक बसथांब्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. काही बसथांबे तुटून पडलेले आहेत. काही ठिकाणी बसण्यासाठीचे बाकडे तुटलेले आहेत. काही बसथांबे गवतात हरवले आहेत. अनेक थांब्यावर रात्रीच्या वेळी मद्यपी जमा होत असल्याने ते ठिकाण असुरक्षित झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून बसची वाट पाहावी लागते.

राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे (एमएसआरटीसी) चालविल्या जाणाऱ्या विद्यमान सेवा तोट्यात चालणाऱ्या आणि शहराच्या गरजांसाठी अपुऱ्या असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. त्यामुळे सिटीलिंक नाशिकमध्ये आली. सध्या सिटीलिंक सेवेची भाडेवाढ झालेली असूनही तोट्यात चालत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मग या बदलाचा उपयोग तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नाशिक
Nashik City Link News : नव्या वर्षात सिटीलिंकच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बसेस

त्यामुळेच बसथांबे सुधारण्यास उशीर होत आहे का, अशीही चर्चा शहरात होत आहे. शहरातील तब्बल ६९१ बसथांब्यांचा प्रस्ताव सिटीलिंक प्रशासनाने मनपा प्रशासनाला दिला होता. त्यातून महसूल मिळवण्यासाठी (बीओटी) तत्त्वावर होणाऱ्या कामाची पद्धत ठरलेल्या जागेवर थांबे उभे करत त्याचा जाहिरातीसाठी वापर करत त्याच्या देखभालीसाठी महसूल मिळवायचा, अशी योजना आखली गेली. त्याला प्रतिसाद मिळाला. बसथांबे उभे राहिले, पण त्या थांब्यांना नाव देण्याच्या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील मुख्यत: सातपूर, शिवाजीनगर, आडगाव, म्हसरूळ, मेरी, गंगापूर रोड, कॉलेज रोड, मखमलाबाद रोड, पेठ रोड, नाशिकरोड, हनुमाननगर, जेल रोड, दसक, पंचक, जय भवानी रोड, देवळाली गाव, भगूर, सिडको, अंबड, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, एमआयडीसी परिसर अशा जवळजवळ सर्व भागांतील बसथांबे जीर्ण झाले आहेत. काही ठिकाणी बसथांबे तुटले असून, तेथे बसणे धोकादायक झाले आहे. कॉलेज रोडसारख्या उच्चभ्रू परिसरातील बसथांबे चक्क दोरीने बांधून ठेवल्याचे दिसत आहे. या परिसरात हजारो विद्यार्थी बस थांब्याजवळ येऊन थांबतात. एखादा बसथांबा पडून दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

एनएमपीएमएलकडे २५० बसेसचा ताफा आहे. त्यापैकी २०० सीएनजी आणि ५० डिझेलवर चालतात. या बसेस तपोवन व नाशिकरोड अशा दोन बस डेपोंमधून चालविल्या जातात. त्यात दररोज सुमारे ६८ हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. सिन्नर, दिंडोरी, सुकेणे, पिंपळगाव बसवंत, जातेगाव, त्र्यंबकेश्वर ही दूरची शहरे या सेवेचा भाग होत आहेत. एनएमपीएमएलची पंतप्रधान अमृत योजनेंतर्गत अजून १०० इलेक्ट्रिक बसेस सध्याच्या ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आहे. पण सध्या फक्त ५० बसेसची मंजुरी मिळाली आहे. यात बसथांब्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. मनपाकडून महसूलनिर्मितीसाठी बसथांबे उभारण्यात आले होते. पण देखभाल झाली नसल्यामुळे आता ते योग्य प्रकारे उपयोगात येत नाहीत. बसथांबे सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या कंपन्यांनीही योग्य देखरेख केली नाही. या सुविधा आता पडिक अवस्थेत आहेत. मग फक्त हे ठेका देऊन टक्केवारी कमावण्याचे तर काम नव्हते ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.

आगामी २०२७ च्या कुंभमेळ्यात लाखो भाविक नाशिकमध्ये येतील, तेव्हा शहरातील अशी दुरवस्था पाहून, नाशिकची स्मार्ट सिटी म्हणून असलेली प्रतिमा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या प्रवाशांना दिवसभर उन्हात उभे राहून बसची वाट पाहात त्रास सहन करावा लागत आहे. महिला व विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण झालेली असून, नाशिक महापालिकेने आता तातडीने बसथांब्यांची दुरुस्ती करत सुरक्षित आणि स्वच्छ सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

आमच्या पाहणीत आढळलेल्या बाबी

हनुमाननगर येथील बसथांबा गेल्या दोन वर्षांपासून कोलमडून पडलेला आहे. जेल रोड येथील दसक बसथांब्याला मद्यपींनी आपला अड्डा केला आहे. बिटको कॉलेज येथील बसथांब्यावर प्रेमीयुगुलांच्या गप्पा रंगलेल्या दिसतात. म्हसरूळ येथील बसथांब्यावर अनेक टवाळखोरांमुळे विद्यार्थिनींना असुरक्षित वाटते. के. के. वाघ कॉलेज येथे बसण्याची बाकडे तुटली आहेत. गणेशबाबा मंदिरासमोर सुरक्षेचे पाइप कापून नेलेले आहेत. शेजारी शेजारी दोन बसथांबे उभारण्यात आले आहेत. त्यातला एक मोडकळीस आला आहे. महात्मानगर येथील बसथांब्यात कचरा गोळा करून ठेवला जातो. द्वारका बसथांब्यालगत रिक्षाचालकांचा घेराव, तर जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर थांब्यांवर प्रवाशांपेक्षा रिक्षांचाच विळखा अधिक दिसतो. वडाळा नाका येथील बसथांब्यावर बसण्यासाठीचे बाक तुटलेले आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याशेजारील थांब्यामागे लघुशंका पॉइंट तयार झाला आहे. जय भवानी रोड येथे न वापरण्यात येणाऱ्या थांब्याला गवताचा वेढा पडला आहे. दत्तमंदिर थांब्याजवळ सांडपाण्याने प्रवाशांना चिखलात उभे राहावे लागत आहे. अशा शहरात शेकडो थाब्यांचा विविध पद्धतीने गैरवापर होत आहे. तारवालानगर ते अमृतधाम रोडवर बसथांबा तयार केलेला आहे. मात्र, या मार्गावर एकही बस आढळत नाही.

सिटीलिंकचा संपूर्ण कारभार

नाशिक महानगर परिवहन महामंडळ (एनएमपीएल) ही सिटीलिंक बससेवा चालविणारी संस्था आहे. तिची स्थापना ८ जुलै २०२१ ला झाली. त्र्यंबकेश्वर रोडवरील गोल्फ क्लबजवळ मुख्यालय आहे. सध्या ६३ मार्गांवर १,३९२ बसथांबे असून, २५० बस धावत आहेत. आणखी ५० एसी ई-बस ताफ्यात येणार आहेत. तपोवन, निमाणी, नवीन सीबीएस आणि नाशिकरोड हे प्रमुख थांबे आहेत. दररोज साधारण लाखो प्रवासी या सेवांचा वापर करतात. बससाठी डिझेल आणि सीएनजी हे इंधन वापरले जात आहे.

नागरिकांचे प्रश्न

  • बसथांब्यांसाठी पैसे खर्च झाले, मग त्यांची देखभाल का नाही?

  • शहराला स्मार्ट सिटी म्हणायचे, पण बसथांब्यांची अवस्था इतकी वाईट का?

  • प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का?

  • प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट पाहात आहे का?

  • जिथे बस थांबतच नाही, तेथे बसथांबे उभारलेच का?

  • ठेकेदाराला बसथांबे उभारण्यासाठी दिलेली संख्या फक्त पूर्ण केली का?

  • इतर प्रवाशांच्या तुलनेत अद्यापही सिटीलिंक बसभाडे महाग असून, प्रवाशांची गैरसोय का?

नागरिकांची मागणी

  • शहरातील सर्व बसथांब्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे.

  • जे बसथांबे पूर्णपणे खराब आहेत, त्यांची पुनर्बांधणी करावी.

  • बसथांबे सांभाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी.

  • प्रत्येक बसथांब्यावर स्वच्छता व प्रकाशयोजना करावी.

  • कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण बसथांब्याची दुरुस्ती करावी.

नागरिकांची मागणी

  • शहरातील सर्व बसथांब्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे.

  • जे बसथांबे पूर्णपणे खराब आहेत, त्यांची पुनर्बांधणी करावी.

  • बसथांबे सांभाळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी.

  • प्रत्येक बसथांब्यावर स्वच्छता व प्रकाशयोजना करावी.

  • कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण बसथांब्याची दुरुस्ती करावी.

बस थांब्यांचा दुरुपयोग

  • मद्यपी वाईट गोष्टींसाठी बसथांब्याचा वापर करतात.

  • अनेक ठिकाणी टपऱ्या थाटून गुटखा विक्री होते.

  • भिकाऱ्यांनी बसथांब्यांवर संसार थाटला आहे.

  • टवाळखोर बस थांबण्याचा सहारा घेत टवाळखोरी करत आहे.

  • भंगार गोळा करणाऱ्यांकडून बस थांब्यांच्या संरक्षण पाइपची चोरी.

  • बसथांब्यांवर कचरा गोळा साठवणूक केलेला दिसतो.

  • रिक्षा, टॅक्सी स्टँडसाठी बस थांबण्याचा सहारा झाला.

  • प्रेमीयुगुलांसाठी गप्पा मारायला कपल पॉइंट

  • बसथांब्याच्या पाठीमागे लघुशंका स्थळांची निर्मिती.

  • काही बसथांब्यांमुळे अतिक्रमणात वाढ

Nashik Latest News

आम्ही कॉलेज सुटल्यानंतर बसची वाट पाहत असताना येथे बसलेले टवाळखोर आमच्यावर कमेंट करतात. त्यामुळे आम्हाला रस्त्याच्या बाजूला जाऊन उभे राहावे लागते. यामुळे अपघाताची शक्यता वाढते. बसथांब्यांवर सीसीटीव्ही बसवावेत. त्यामुळे मुलींना थोडे सुरक्षित वाटेल.

पीयूषा पाटील, विद्यार्थिनी

मी दत्त मंदिर सिग्नलला बसथांब्यावर आले असता, शेजारी टपरी असल्याने येथे मुले सिगरेट ओढत होती. तो धूर आमच्या अंगावर सोडत होती. बस आल्यावर मुलांनी मला बसमध्ये चढू दिले नाही. विशेष म्हणजे बसथांब्यावर सांडपाणी तुंबलेले होते. त्यामुळे प्रशासनाने बस थांब्यांवर वृद्धांसाठी योग्य व्यवस्था करावी.

आशा निकाळजे, वृद्ध प्रवासी

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बसथांबे जीर्ण झाले आहेत. प्रवाशांना दर्जेदार निवारा शेड उपलब्ध करणे हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे सिटीलिंक असो वा राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना सुस्थितीतील, सुरक्षित व उपयुक्त बसथांबे उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणांची प्राथमिक जबाबदारी आहे.

विजय काळदाते, जिल्हाप्रमुख, शिव वाहतूक सेना, नाशिक

संबंधित ठेकेदाराला महापालिकेकडून नोटीस बजावली असून, तातडीने बसथांबे दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल.

रवींद्र बागूल, कार्यकारी अभियंता, वाहतूक कक्ष, मनपा

महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या ठेक्यानुसार हे बसथांबे निर्माण केले आहेत. संबंधित ठेकेदारासमवेत महापालिकेने करार केला आहे. त्यानुसार या बसथांब्यांची दुरुस्ती केली जाणे आवश्यक आहे. सिटीलिंकमार्फत या संदर्भात पाठपुरावा करत आहोत.

डॉ. विजयकुमार मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news