

नाशिक : दादासाहेब गायकवाड
यावर्षी झालेल्या अवकाळी व उशिरापर्यंत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे द्राक्ष उत्पन्नात ६० टक्के घट येणार आहे. भारतात द्राक्षाचे उत्पादन कमी होणार असल्याचा फायदा मुक्त व्यापार धोरणामुळे चीनने उचलला असून, त्यांची द्राक्षे मुंबईच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत.
महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया नाशिक
महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. साधारणत: एकट्या नाशिक जिल्ह्यात पावणेदोन लाख एकर द्राक्ष पीक मागील वर्षी होते. परंतु, अवकाळी पाऊस, भावाची नसलेली गॅरंटी, औषधांच्या वाढत्या किमतींसह मजुरीत झालेल्या वाढीमुळे द्राक्ष उत्पादक मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे साधारणतः ३० टक्के द्राक्ष उत्पादकांनी बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. ज्या द्राक्षबागा शिल्लक आहेत, त्यांवर फक्त ४० टक्के फळधारणा झालेली आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात तोट्यात गेली आहे. याचा फटका अनेकांना बसला आहे. विशेष म्हणजे द्राक्ष उत्पादनच कमी असल्याने नाशिकमध्ये बेदाणा उत्पादकांनी यावर्षी शेड बांधण्यास टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन १० ते १५ टक्केच होण्याची शक्यता असल्याने बेदाण्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फायदा चीनने उचलला आहे. आजमितीस अफगाणिस्तानातील बेदाणा थेट झाडावर तयार होत असल्यामुळे हा उत्कृष्ट प्रतीचा समजला जातो. चीनचा बेदाणा मागील २ ते ३ वर्षांपासून पाकिस्तानमार्गे भारतात विक्री होत आहे. विशेष म्हणजे या बेदाण्यावर अफगाणिस्तानचे लेबल लावून येत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनीच प्रसार माध्यमांना दिली.
चीनच्या द्राक्षाला ३०० रुपये भाव
मागील १५ ते २० वर्षांचा विचार करता, नाशिकमधून २० ते २५ देशांत द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, आता देशांतर्गत मागणी असूनही द्राक्ष उत्पादन नसल्यामुळे याचा फायदा चीनने घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुक्त व्यापार धोरणाच्या नियमानुसार चीनची द्राक्षे नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये ३०० रुपये किलो भावाने विक्री होत आहेत. ही द्राक्षे चवीला गोड आहेत. यासह चीनमधील अनेक द्राक्षांच्या व्हरायटीची लागवड महाराष्ट्रात आगामी काळात होऊ शकते, याबाबतही प्रयत्न सुरू झालेले आहेत.
दरवर्षी आम्ही द्राक्षाचे चांगले उत्पादन घेत होतो. पण अवकाळी व संततधार पावसामुळे द्राक्षबागाचे नियोजन करणे अनेकांना शक्य झाले नाही. यामुळे फक्त ४० टक्के उत्पदान निघण्याची शक्यता आहे. शिवाय काही बागा फेल गेल्यामुळे दोन तीन एकर बाग तोडावी लागली.
भरत माळी, वडनेरभैरव, ता. चांदवड