

नाशिक : इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यांमध्ये बालविवाहाचे प्रकार सुरूच आहेत. मंगळवारी (दि.२०) महिला व बालविकास विभागाच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील धारगाव आणि त्र्यंबक तालुक्यातील हरसूलजवळील चिंचवड या दोन गावांत मुलींचे बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी मंगल भोये यांनी दिली.
शिक्षणाचा अभाव आणि जनजागृतीची कमतरता हे ग्रामीण भागातील बालविवाहाचे मुख्य कारण मानले जाते. इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील बालविवाहाबाबत चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर माहिती मिळाल्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर आणि पोलिसपाटील यांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. संबंधित पालकांना बालविवाह न करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली तसेच हमीपत्रही लिहून घेण्यात आले.
त्याच दिवशी त्र्यंबक तालुक्यातील चिंचवड येथे मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी लहान बहिणीलाही हळद लावली जात असल्याचे लक्षात येताच संशय बळावला. तत्काळ हस्तक्षेप करत महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी लग्न थांबवले. चौकशीत संबंधित मुलगी केवळ १६ वर्षे १ महिन्यांची असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातही पालकांकडून हमीपत्र घेण्यात आले असून, दोन्ही प्रकरणांतील संबंधितांची सुनावणी उंटवाडी येथील बालकल्याण समितीसमोर होणार आहे.
बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने पुढे येणे आवश्यक आहे. सतर्क नागरिकांमुळे अनेक निष्पाप मुलींचे आयुष्य वाचवता येते. मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असताना विवाह केल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. कुठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०९८ या चाइल्ड हेल्पलाइनवर तत्काळ कळवावे.
सुनील दुसाने, महिला व बालविकास अधिकारी, नाशिक