

नाशिक : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना ही अंत्यत दुर्दैवी व मनाला दु:ख देणारी घटना आहे. या घटनेत कोणी हलगर्जीपणा केला आहे का हे चौकशीतून समोर येईल, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
मालवण दुर्घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनेबाबत जाहीर माफीदेखील मागितली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक दाैऱ्यावर असलेले मंत्री भुजबळ यांना गुरुवारी (दि.२९) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुतळा पडणे ही घटना दुर्दैवी आहे. यामुळे मराठी माणूसच नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना दु:ख झाले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचादेखील मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. कुठेही पुतळा उभारताना सर्व गोष्टींचा विचार केला जातो. पण, मालवणच्या घटनेत पुतळा उभारताना काही तरी गफलत झाल्याचे भुजबळ म्हणाले.
पुतळा उभारण्याबाबत शासनाचे पूर्वीपासून कडक नियम केलेले आहेत. पुतळा कसा दिसला पाहिजे, कसा असला पाहिजे याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत. तसेच पुतळा उभारताना अनेक विभागांकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, त्यानंतरही अशा गोष्टी घडत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.