Amruta Pawar | छगन भुजबळांची नाराजी दुर्दैवी, अमृता पवार सडेतोड बोलल्या
नाशिक : मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे हजारो कोटींची कामे करतात अन् लाखांच्या कामाला जिल्हा परिषद प्रशासनाने बोलावले नाही म्हणून विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करतात. त्यांची उंची मोठी आहे, त्यांनी अशी तक्रार केली ही दुर्दैवीबाब असल्याची भावना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार यांनी व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री भुजबळ यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. नांदूरमध्यमेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी आणि आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले नसल्याबाबत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्रशासन आणि माजी सदस्या अमृता पवार, सुरेखा नरेंद्र दराडे यांच्या विरोधात ही तक्रार आहे. आता यावरून पवार यांनी मंत्री भुजबळ यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
पवार यांनी, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत विषय आहेत. त्यांसंदर्भातील कामे होणे आवश्यक होते. जिल्हा परिषदेच्या निधीतून, मी प्रतिनीधित्व करत असलेल्या गटात ही कामे झालीत. या कामांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. मात्र तसा काही हेतू नव्हता. तरी एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने एवढे छोटे मन दाखवले याचे दुःख वाटते, असे त्यांनी नमूद केले.
भाजपश्रेष्ठींची भेट घेणार
येवला विधानसभा मतदारसंघातून भाजपनेत्या अमृता पवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी दराडे कुटुंबाकडून चाचपणी सुरू आहे. आपले प्रतिस्पर्धी असल्याने भुजबळांनी तक्रार केल्याचा दावादेखील पवार यांनी केला आहे. तर याबाबत आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषदेत शिक्षण व आरोग्य विभागाची सभापती म्हणून कार्यभार सांभाळत असताना या कामासाठी निधी मंजूर केला होता. तसेच मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रण देण्याचे काम प्रशासनाचे होते. त्यांनी दिले की नाही माहीत नाही.
- सुरेखा नरेंद्र दराडे, माजी सदस्या, जिल्हा परिषद

