नाशिक : कधीकाळी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणून गणल्या जाणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक येथील सर्वपक्षीय नेत्यांनी बुडवून टाकली. ज्यांनी ती बुडविली त्यांचीच पुढील पिढी आता पुन्हा बँकेवर ताबा मिळविण्यासाठी निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
जिल्हा बँक पुर्णपणे अडचणीतून बाहेर येत नाही तोपर्यंत कृपा करून बँकेची निवडणूक घेऊ नका, असे मी सरकारला सांगितले आहे, असा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. बँक बुडविणाऱ्यांच्या नव्हे तर प्रशासकांच्यात ताब्यात राहू द्या, असे सुनावत मंत्र्यांनी बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, असा अप्रत्यक्ष टोलाही भुजबळ यांनी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता लगावला आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या मंत्री भुजबळ यांनी शनिवारी (दि. १२) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेविषयी त्यांनी भाष्य केले. बँकेच्या प्रशासकांच्या कारभारावर समाधान व्यक्त करताना बँक उर्जितावस्थेत येत नाही तोपर्यंत बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक घेतली जाऊ नये. अन्यथा तीच माणसे तीच कुटुंब बँकेवर ताबा मिळविण्यासाठी तयार आहेत. पुन्हा तोच गोरखधंदा सुरू होईल, असा हल्लाबोल त्यांनी केला. शहरात एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यांची अवस्था खराब आहे.
रस्त्यांची अवस्था पाहून उद्योजक येत नाहीत, अशा तक्रारी आहेत. शहरात खड्डे असतील तर भाविक कसे येणार ? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाचे टर्मिनल वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सांगली ड्रग प्रकरणात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. नाशिक मध्ये देखोल ड्रग्जचे प्रकार होत आहेत. काही परदेशी विद्यार्थी ड्रग्ज घेऊन दादागिरी करत आहेत. त्यामुळे पोलीस कारवाई करतील, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली आहे.