

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू- महंतांसह सामान्य नागरिकांच्या सूचना घेतल्या जात आहेत. मग मी सूचना केल्या, तर बिघडले कुठे? असा सवाल करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील कामे थांबवा असे मी आदेश दिलेले नाहीत. कुंभमेळ्यापर्यंत जी कामे पूर्ण होणार नाहीत, ती हाती घेतली जाऊ नयेत, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी गुरुवारी (दि. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठविली जात आहे. यासंदर्भात भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. 22) माध्यमांशी संवाद साधताना सिंहस्थासंदर्भात मी केवळ सूचना दिल्या आहेत. मी कोणतेही आदेश दिलेले नाहीत. मी केवळ समजून घेत माझे मतप्रदर्शन केले, असे भुजबळ यांनी सांगितले. मी या बैठकीत महामार्गावरील कोणतीही कामे थांबवा असे निर्देश दिलेले नाहीत.
महामार्गावरील अंडरपासच्या आजूबाजूचे रस्ते खराब झाले आहेत. त्यात नवीन काम काढाल, तर कुंभमेळ्यात अडचण होणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याआधी ही कामे पूर्ण होणार असतील, तर त्याला हरकत नाही, असे सांगितल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकांसाठी आमचा पक्ष सज्ज असल्याचे सांगत, महाराष्ट्रात मला जिथे प्रचाराला बोलावले जाईल, तिथे आपण जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भुजबळ आणि माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओबद्दल भुजबळांना विचारले असता, हाके यांच्याशी मी बोललो असून, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तसेच ते याबाबत खुलासा करणार असून, आमच्याही लोकांना त्यावर कमेंट्स न करण्याच्या सूचना मी केल्याचे भुजबळांनी सांगितले.
कुंभमेळ्याचा 'मलिदा' चाखण्यासाठी भुजबळांची उठाठेव सुरू असल्याचा आरोप आमदार सुहास कांदेंनी केला आहे. भुजबळांच्या पालकमंत्री पदाला कांदेंनी दर्शविलेला विरोध आणि त्यानंतर कुंभमेळ्याच्या बैठकीबाबत केलेल्या आरोपासंदर्भात भुजबळ यांना विचारले असता त्यांनी, 'नो कॉमेन्ट्स' म्हणत कांदेंवर थेट बोलणे टाळले.