

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी साडेचार महिन्यांपूर्वी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यांनी अद्याप शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. यावर सध्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले असून, एखादे घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसे काय बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहेत, असे त्यांनी सांगितले.
मंत्री भुजबळ यांनी सोमवारी (दि. 4) नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची कार्यालये आणि निवासस्थाने कुठे असावीत या संदर्भातील व्यवस्था पाहत असते. त्यांनी मला 15 दिवसांनी पत्र दिले की, तुमच्यासाठी अमुक-अमुक निवासस्थान देण्यात आले आहे. याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावे. आता राहायला जायचे म्हटल्यास घर खाली असायला पाहिजे. तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत आहे, तर आपण त्यांना कसे काय बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एका शब्दानेही बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील? याची मला काही कल्पना नाही.
आता खुद्द छगन भुजबळांनी शासकीय निवासस्थानाबाबत भाष्य केल्याने आता राज्य सरकार व सामान्य प्रशासन विभाग धनंजय मुंडेंना घर खाली करण्यास सांगणार की, मग धनंजय मुंडे स्वत:हून घर खाली करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, नियमानुसार पुढील 15 दिवसांच्या आत शासकीय बंगला खाली करणे अपेक्षित होते. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी भुजबळ यांच्याकडे देण्यात आली. त्यानुसार, 23 मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेशही जारी झाला. असे असूनही अद्याप मंत्री भुजबळ यांना शासकीय निवासस्थान मिळाले नाही. त्यामुळे भुजबळांना अद्याप गृहप्रवेशाची प्रतीक्षा कायम आहे.
----------------------
-------------------