

इंदापूर : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जास्त बोलू इच्छित नाही. विरोधी पक्ष अशा गोष्टींचा फायदा घेणारच. मुख्यमंत्र्यांनी दोनदा याबाबत नाराजी व्यक्त केली आहे,असे म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. इंदापूर येथे गुरुवारी(दि.२४) पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते स्पष्ट केली.
स्वस्त धान्य दुकानांच्या मागणी बाबत भुजबळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, मागणीप्रमाणे कार्यवाही केली जाईल आणि याबाबत त्यांनी सहकाऱ्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले आहे. दौंड येथील गोळीबार कला केंद्राच्या घटनेबाबत त्यांना माहिती नसल्याचे सांगत,ही बाब मीडियात आली तर पोलिस कारवाई करतील,असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाबाबत प्रश्न विचारताच भुजबळ चिडले 'काय त्याचे घेऊन बसलाय तुम्ही? असले प्रश्न विचारताय,' असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्जमाफीच्या आंदोलनांबाबत ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी कर्जमाफी करू, असे सांगितले आहे. लोकांना ती तात्काळ हवी आहे, पण योग्य वेळी ती होईल.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर भुजबळ यांनी,आमच्याकडे अशी कोणतीही चर्चा नाही. मीडियाला कदाचित जास्त माहिती असेल,” असे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देण्याचा त्यांचा अधिकार आहे,” .शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे केलेले कौतुक योग्य असल्याचे सांगत, छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे.