वेड लागलं का? औरंगजेबाला कोण लाच देईल? भुजबळ राहुल सोलापूरकरांवर संतापले
पुढारी ऑनलाइन डेस्क | छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राजकीय व सामाजिक वर्तुळात अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आमदार अमोल मिटकरी, आमदार जितेंद्र आव्हाड, रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील सोलापूरकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
छगन भुजबळ यांनी आज (दि.4) सकाळी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाबाबत भुजबळांना विचारण्यात आलं. त्यावर या लोकांना वेड लागलं आहे का? शिवरायांबाबत वाटेल ती विधानं कशी करता? असा संतप्त सवाल भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.
भुजबळ म्हणाले, औरंगजेबाला कोण लाच देईल. त्याचे आख्ख्या देशावर राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा च्या तुरुंगातून मोठ्या शिताफीने सुटले. महाराजांनी नियोजन करुन स्वराज्य निर्माण केलं. त्याचप्रकारे आग्र्याहुन सुटका करण्यासाठी त्यांनी रणनिती आखली. त्यांच्या बुद्धीमत्तेमुळेच ते तेथून सुटले. शिवाजी महाराज जर लाच देऊन सुटले असते, तर संभाजी महाराजांबरोबर घोड्यावर बसून आरामात निघून आले असते, पण त्यांनी संभाजी महाराजांना काशीला कुणाच्यातरी ताब्यात दिलं आणि रायगडावर एकटे पोहोचले. त्यावेळी माँ जिजाऊ त्यांना विचारतात, की शंभू राजे कुठं आहेत. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, हा इतिहास आहे. हा इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण असा सवाल छगन भुजबळांनी केला.
नेमकं काय म्हणाले राहुल सोलापूरकर ?
''महाराजांच्या काळात पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत असा दावा सोलापूरकर यांनी केला.
मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो. असे राहुल सोलापुरकर यांनी मुलाखतीत म्हटले होते. तसेच हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते असेही त्यांनी म्हटले. अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या याच विधानावरुन सध्या वादंग निर्माण झाला आहे. शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राहुल सोलापूरकर महामूर्ख : जितेंद्र आव्हाड
अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल. अशी एक्स पोस्ट करत राष्ट्रवादी(शरद पवार गटाचे) नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे.

