

पुढारी ऑनलाइन डेस्क | महायुतीच्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या भुजबळांनी आता मुंबईकडे कूच केली आहे. येत्या - दोन तीन दिवसांत ते ओबीसी नेत्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. दरम्यान, भुजबळांना मनावण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. भुजबळांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरु झाली आहे. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची दिलेली ऑफर भुजबळांनी नाकारल्याचे समजते आहे.
भुजबळांनी आपण अनेक राज्यात जाणार असून ओबीसी एल्गार पुकारणार असल्याची भूमिका नाशिकमधील मेळाव्यात जाहीर केली. आजून निवडणूका संपल्या नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका बाकी असल्याची आठवण करुन देत त्यांनी महायुतीला एकप्रकारे इशारा दिला. त्यामुळे भुजबळांकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे लक्षात घेऊन महायुतीकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले राज्यमंत्रिपद घ्या अशी विचारणा भुजबळांना झाली. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भुजबळांनी ही ऑफर नाकारल्याचे समजते आहे.
केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे. त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला होता. हे पद भुजबळांना दिलं जावू शकतं. मात्र, भुजबळ ते स्विकारण्याची शक्यता फार कमी आहे.
राज्यमंत्रिपदाऐवजी सन्मानपूर्वक कॅबिनेट मंत्री पदाचा प्रस्ताव ठेवल्यास भुजबळ तो स्विकारु शकतात असेही बोलले जात आहे. त्यासाठी भुजबळांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविणे व कॅबिनेट मंत्रीपद देणे उचित ठरेल का यावर भाजपश्रेष्ठींची चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले असून उपोषणाची तारीख ठरली आहे. 25 जानेवारीपासून जरांगे आमरण उपोषण करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तोंडावर असताना जरांगे यांचे उपोषण महायुतीला परवडणारे नाही. अशात ओबीसी नेते भुजबळ यांनी काही वेगळी भूमिका घेतल्यास महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी आता महायुतीचे नेते सरसावले आहेत. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे व गिरीश महाजन हे भुजबळांच्या संपर्कात असून राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे हेही समीर भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या संपर्कात असून चर्चा करत आहेत.
नाशिकमधील मेळाव्यात छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. त्याचवेळी त्यांनी सुनिल तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला साथ दिल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवार व छगन भुजबळ यांचे सूरु पुन्हा जुळतील असे चित्र वाटत नाही. तसे झाल्यास भुजबळांसमोर तीन पर्याय असल्याचे बोलले जात आहे. त्यातला पहिला पर्याय म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करणं, दुसरा भाजपमध्ये जाणे व तिसरा स्वत:चे ओबीसी संघटन करणे होय.