

Brave Jawan Kishore Immortal...
चांदवड ( नाशिक ) : अमर रहे, अमर रहे, वीर जवान किशोर अमर रहे… अशा देशभक्तीपर घोषणांनी चांदवड तालुक्यातील पाटे गाव दुमदुमून गेले. जम्मू–काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले जवान किशोर अंबादास ठोके (३०) यांच्यावर रविवारी (दि. १४) सायंकाळी शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाटेचे भूमिपुत्र असलेले जवान किशोर ठोके जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे कार्यरत होते. त्यांना शुक्रवारी (दि. १२) घरी येण्यासाठी रजा मंजूर झाली होती. मात्र, कार्यरत ठिकाणाहून खाली येत असताना हृदयविकाराचा झटका आला. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती गावात पोहोचताच पाटेसह चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली. शनिवारी (दि. १३) जम्मू काश्मीरमधील प्रतिकूल हवामानामुळे जवानांचे पार्थिव उशिरा रविवारी (दि. १४) दुपारी ओझर विमानतळावर आले. सायंकाळी उशिरा पार्थिव पाटे गावात दाखल झाले.
देशाच्या संरक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरपुत्राच्या अंतिम दर्शनासाठी गावातील सर्व रस्त्यांवर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. संपूर्ण गाव फुलांनी सजवण्यात आले होते. पार्थिव गावात पोहोचताच दर्शनासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला. ‘वीर जवान किशोर ठोके अमर रहे’ या घोषणांनी परिसर भारावून गेला. देशभक्तीपर गाणी व घोषणांमुळे वातावरण भावूक झाले. अंतिम यात्रेदरम्यान नागरिकांनी फुलांचा वर्षाव करीत वीर जवानाला अखेरचा निरोप दिला व अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी तहसीलदार अनिल चव्हाण, पोलिस निरीक्षक कैलास वाघ, लेफ्टनंट कर्नल अरविंद, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांनी गुलाबपुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. ठोके कुटुंबीय व नातेवाईकांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. लहान भाऊ सागर याने मुखाग्नी दिला. जवान किशोर यांचे पार्थिव घरी पोहोचताच आई व पत्नीने हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले.
बाळ तुम्हाला कुठे, कसं शोधेल
अहो, उठा ना… तुमचं बाळ तुम्हाला हाक देतंय. डोळे उघडा, एकदा तरी पाहा… आज तुमच्या कुशीत येण्यासाठी ते किती आतुर आहे. असे झोपलात का, आता हे निष्पाप बाळ तुम्हाला कुठे, कसं शोधेल, मी बाळाला काय सांगू की त्याचे बाबा उठत नाहीत, की त्यांनी आपल्याला सोडून दिलं, अहो, मलाही सोबत घेऊन जा ना… अशा हृदयस्पर्शी शब्दांत पत्नी वैशाली वीर किशोरच्या चेहऱ्यावर हात फिरवत हुंदके देत होती.