

चांदवड (नाशिक) : जम्मू- काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना ५६ आर. आर. रायफल्स युनिटमध्ये कार्यरत जवान किशोर अंबादास ठोके (३०) यांना शुक्रवारी (दि. १२) रोजी तीव्र हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यातच वीरमरण आले. ठोके मुळचे चांदवड तालुक्यातील पाटे गावातील रहिवाशी असून त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
जवना किशोर ठाके शुक्रवारी सेवा बजावत असताना त्यांना तीव्र हृद्यविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे माहिती आहे. त्यांचे पार्थिव शनिवारी रोजी सायंकाळी ओझर विमानतळ, नाशिक येथे येणार होते. मात्र, जम्मू- कश्मीरमधील हवामान खराब असल्याने विमान उड्डाणास अडचण येत असल्याने उड्डाण घेऊ शकले नाही. यामुळे रविवारी (दि. १४) रोजी हवामान कोरडे झाल्यास त्यांचे पार्थिव विमानाद्वारे ओझर विमानतळावर पोहचेल अशी माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी स्टेशन मुख्यालय देवळाली यांच्या वतीने लष्करी सन्मानासह गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाटे येथे आणण्यात येणार आहे. गावात शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रेत नागरिक, माजी सैनिक, विविध संघटना तसेच शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
जवान ठोके यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, देशासाठी दिलेल्या बलिदानाचा अभिमान कुंटुबीयांकडून व्यक्त केला जात आहे. पाटे गावाने देशसेवेसाठी दिलेल्या या सुपुत्रास संपूर्ण तालुक्याचा मानाचा सलाम आहे.