

नाशिक : शहरात वारंवार घडणाऱ्या चेनस्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यात गुन्हे शाखा युनिट - 1 आणि 2 ला मोठे यश मिळाले. रेकॉर्डवरील अट्टल सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून 22 चेनस्नॅचिंग आणि 2 वाहनचोरी असे 24 गुन्हे उघडकीस आले. सुमारे 26 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरातील विविध चेनस्नॅचिंगच्या ठिकाणांची पाहणी करत संशयितांच्या हालचालींबाबत माहिती संकलित केली. माहीतगाराच्या मदतीने तपास करत असताना संबंधित आरोपी हा मूळचा अमनेगाव (ता. भिवंडी) येथील असल्याची माहिती निष्पन्न झाली. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट -1 चे हवालदार नाझीमखान पठाण, मुक्तार शेख तसेच गुन्हे शाखा युनिट 2 चे शंकर काळे व सुनील आहेर यांना माहिती मिळाली की, सादिक अली ऊर्फ जाफरी युसूफ सय्यद (रा. आंबेवली, कल्याण) याने नाशिक शहरात चेनस्नॅचिंगचे गुन्हे केले असून, तो सध्या कल्याण येथे वास्तव्यास आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कळवली असता, त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक दोन दिवस व दोन रात्री साध्या वेशात कल्याण येथे होते. आरोपी दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस कोठडीमध्ये चौकशीत अधिकाऱ्यांनी मानवी कौशल्याचा वापर करत आरोपीकडून नाशिक शहरातील 22 चेनस्नॅचिंग व 2 वाहनचोरी असे 24 गुन्हे उघडकीस आणले.
आरोपीकडून 13.4 तोळे सोने, 10 लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी आणि 80 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 26 लाख 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, गुन्हे शाखा युनिट 1 व 2 च्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे कामगिरी पार पाडली.