

नाशिक : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मे महिन्यात एकूण २,१७८ विद्यार्थ्यांनी जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले होते, त्यापैकी ७७९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित १,३९९ प्रकरणे सध्या प्रलंबित असून त्यांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी, बारावीनंतरच्या प्रवेशांसह पॉलिटेक्निक प्रवेशासाठी वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध सवलती आणि योजनांचा लाभ मिळतो. या पार्श्वभूमीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थाअंतर्गत कार्यरत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे नाशिक विभागात मे अखेरपर्यंत एकूण २,१७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७७९ प्रकरणांची छाननी पूर्ण झाली असून उर्वरित १,३९९ प्रकरणांतील विलंब टाळण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना जात प्रमाणपत्र त्वरीत मिळण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे. याअंतर्गत या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने गुणवत्तेच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया करण्यात येते. या संदर्भात नाशिक समितीच्या पोलिस दक्षता पथकालादेखील गृह व शालेय चौकशी व कागदपत्रांच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी नाशिक येथील सहआयुक्त तथा उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पलाईन क्रमांक 0253-2577059 कार्यान्वित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षाद्वारे आवश्यक माहिती देण्याची व्यवस्था असून, मोहिमेचा दैनंदिन आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.