Case filed against eight suspects in 'ICU' scam case
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा रुग्णालयासह मालेगाव सामान्य रुग्णालयातील मॉड्यूलर आयसीयूच्या उभारणीचे काम बनावट परवानाधारक कंपनीला देऊन सुमारे तीन कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना काळात २०२१/२२ साली नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात ३० खाटांचे तर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात १० खाटांचे मॉड्यूलर आयसीयू तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून ठाणे जिल्ह्यातील क्रेनोव्हेटिव्ह पॉवरटेक प्रा. लि. (सीपीपीएल) या कंपनीला काम देण्यात आले.
आरोग्य सेवा तथा अभियान संचालकांच्या आयुक्तांनी अवाजवी खर्चाबाबत आक्षेप नोंदविला होता. राज्यस्तरावरून मान्यता न घेताच सुरू केलेले काम थांबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी ६ कोटी ७४ लाखांचा सुधारीत प्रस्ताव मान्यतेसाठी राज्यस्तरावर पाठविला. विशेष म्हणजे मुळ किंमत कमी न करता क्यूबिकल पार्टिशनचे काम कमी करून हा प्रस्ताव सादर केला होता. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक संदीप मेटकर (५७, रा. कामटवाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रे केली तयार : संशयित आरोपी डॉ. अशोक थोरात, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. उत्कर्ष दुधेडिया, औषध निर्माण अधिकारी शिरीष माळी यांनी दंतयात्रिकी सागर चोथवे, त्यांची पत्नी अश्विनी चोथवे व वडील दिलीप चोथवे यांच्याशी संगनमत केले. अश्विनी चोथवे व दिलीप चोथवे संचालक असलेल्या क्रेन नोवेटिव्ह पॉवरटेक प्रा. लि. कंपनीने जिल्हा रुग्णालय, नाशिक व सामान्य रुग्णालय मालेगाव येथील मॉड्यूलर आयसीयूचे काम मिळविण्यासाठीची निविदा प्राप्त करण्यासाठी औषध परवाना, वार्षिक उलाढाल व अनुभव प्रमाणपत्रासारखे बनावट कागदपत्र तयार करून ती सादर केली.