नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.14) सायंकाळच्या सत्रात वांग्याच्या दराने विक्रमी उसळी घेतली. बाजारात वांग्याची एकूण आवक सर्वसाधारण १०६ क्विंटल इतकी झाली असून, त्यास प्रति क्विंटल तब्बल १३ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. यामुळे किरकोळ विक्रीत वांगे १५० ते १८० प्रती किलो विकले जात आहेत.
बाजार समितीच्या नोंदीनुसार मागील काही दिवसांपासून वांग्याची आवक घटली आहे. सध्या थंडी वाढल्याने वांग्याच्या आवक कमी झाली आहे. त्यात पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. किमान १०६ क्विंटल तर कमाल ४०० क्विंटल इतकीच आवक नोंदविण्यात आली. त्यामुळे किरकोळ बाजारात वांग्याचा दर प्रति किलो १५० ते १८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या दरांमुळे वांगे उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना मोठी अडचण सहन करावी लागत आहे.
दरम्यान, भाजीपाल्याच्या इतर प्रकारांमध्ये भोपळ्याला सर्वात कमी भाव मिळाल्याचे दिसून आले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भोपळ्याची आवक सुमारे ८६४ क्विंटल इतकी असून, त्यास प्रति क्विंटल १ हजार ५३७ रुपयांचा भाव मिळाला. तसेच फ्लॉवरची ५९४ क्विंटल तर टोमॅटोची ३९४ क्विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली आहे.त्यात कोबी, ढोबळी मिरची, कारले ,दोडका, गिलके, भेंडी, गवार, यांना देखील सर्वसाधारण भाव मिळाला आहे. एकूणच भाजीपाल्याच्या दरातील चढउतारांमुळे बाजारात अस्थिरता कायम आहे.