Boycott of voting in Malegaon Lok Sabha | आणि म्हणून येथे झाले शून्य टक्के मतदान…

मालेगाव : मतदानावर बहिष्कार टाकलेल्या मेहुणे ग्रामस्थांशी चर्चा करताना तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल खताळ. दुसर्‍या छायाचित्रात मराठी शाळेत असलेल्या तिन्ही मतदान केंद्रांवरील शुकशुकाट. (छाया : नीलेश शिंपी)
मालेगाव : मतदानावर बहिष्कार टाकलेल्या मेहुणे ग्रामस्थांशी चर्चा करताना तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल खताळ. दुसर्‍या छायाचित्रात मराठी शाळेत असलेल्या तिन्ही मतदान केंद्रांवरील शुकशुकाट. (छाया : नीलेश शिंपी)

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा – तीव्र पाणीटंचाई व दोन – तीन वर्षांपासूनचे दुष्काळी अनुदान रखडल्याच्या निषेधार्थ मेहुणे ग्रामस्थांनी दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांची शिष्टाई व्यर्थ ठरल्याने अखेर निवडणूक कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. याठिकाणी शून्य टक्के मतदान झाले.

नांदगाव तालुक्यातील ५६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून मेहुणे गावाला पाणीपुरवठा होतो. या योजनेच्या माध्यमातून गावाला महिना – दीड महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. त्यातच पाळीव जनावरांनाही पाणी उपलब्ध करताना शेतकर्‍यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच दुष्काळी अनुदानही मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये राजकीय नेत्यांसह प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष खदखदत होता. पाणीटंचाईतून मुक्तता करावी तसेच दुष्काळी अनुदान द्यावे, ही मागणी प्रशासनाने दुर्लक्षित केल्याने ग्रामस्थांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने तोडगा काढला नसल्याने सोमवारी (दि.२०) रोजी झालेल्या मतदानाकडे मतदारांनी पाठ फिरवली. याची माहिती मिळताच अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नितीन देवरे, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल खताळ यांनी मेहुणे येथे धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अधिकार्‍यांनी दुष्काळी अनुदानासह पाणीटंचाईसंदर्भात आठ दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देत मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु, मागण्यांबाबत अनेक वेळा पाठपुरावा, निवेदने देऊनही समस्या कायम असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला. जोपर्यंत झाडी- चणकापूर धरणातून पाणीपुरवठा योजना सुरू होत नाही, दुष्काळी अनुदान मिळत नाही, तोपर्यंत आमचा मतदानावरील बहिष्कार कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी मांडल्याने अधिकार्‍यांना माघारी फिरावे लागले. त्यानंतरदेखील पोलिस अधिकारी खताळ यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने सायंकाळी 6 पर्यंत गावातील एकाही मतदाराने मतदान केले नाही. निवडणूक अधिकारी व कर्मचारी आले, तसे माघारी फिरले.

तिन्ही केंद्रांवर शुकशुकाट

मेहुणे गावात एकूण दोन हजार ७५७ मतदार संख्या आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ५३, ५४ आणि ५५ अशी तीन मतदान केंद्रे देण्यात आले होते. परंतु, ग्रामस्थांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकल्याने या तिन्ही मतदान केंद्रांवर दिवसभर शुकशुकाट होता. विशेष म्हणजे उमेदवारांचे बूथ प्रतिनिधीही मतदान केंद्राकडे फिरकले नाहीत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news