

वैद्यकीय पदवी व परवाना नसताना उपचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या घोषाल दाम्पत्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जामीन नाकारला.
पीडित रुग्ण शुभम गुजर यांनी कोणताही वकील न नेमता स्वतः न्यायालयात बाजू मांडली.
चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी ‘स्किनरेला क्लिनिक’ सील करून पुढील तपास सुरू केला आहे.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वैद्यकीय परवाना व मान्यताप्राप्त पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करून शेकडो रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्याप्रकरणी अटक केलेल्या बोगस डॉक्टर दाम्पत्याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. डॉ. जयदीप सलील घोषाल व डॉ. सुजाता जयदीप घोषाल (पिंगे) या दाम्पत्याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर शनिवारी (दि. ३१) न्या. दळवी यांच्यासमोर सुनावणी झाली.
सुनावणीनंतर न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जामीन नाकारला. या प्रकरणात फिर्यादी तसेच पीडित रुग्ण शुभम गुजर यांनी कोणताही वकील न नेमता स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू ठामपणे मांडली. सरकारी पक्षातर्फे अॅड. गोरवाडकर यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, पोलिसांनी कॉलेज रोडवरील घोषाल दाम्पत्याचे 'स्किनरेला क्लिनिक' सील केले असून पुढील तपास सुरू आहे.
विसे मळा परिसरात या बोगस डॉक्टर दाम्पत्याने वैद्यकीय पदवी नसतानाही त्वचारोगतज्ज्ञ असल्याचे भासवून उपचार केल्याचा तसेच बेकायदा प्लास्टिक सर्जरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार देवकर यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी घोषाल दाम्पत्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले होते. पीडित शुभम गुजर काही महिन्यांपूर्वी चेहऱ्यावरील त्वचारोगाच्या उपचारासाठी स्किनरेला क्लिनिकमध्ये गेला होता.
मात्र योग्य पात्रता नसताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या उपचारांमुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. या घटनेनंतर प्रकरणाला वाचा फुटली आणि तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.