Nashik Road Repair | निकृष्ट रस्ते दुरुस्ती; आयुक्तांची धडक कारवाई
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या शहरात रस्ते दुरुस्तीच्या कामे जोरात सुरू आहेत. मात्र, यातील बरीच कामे थातूरमातूर पद्धतीने केली जात असल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी 'ऑन फिल्ड' उतरत संबंधितांवर कारवाई केली.
कामांच्या गुणवत्तेबद्दल कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वडाळा शिवार येथील संत सावता माळीनगर, विठ्ठल मंदिर परिसरात सुरू असलेल्या रस्ता दुरुस्ती व सरफेस ड्रेसिंग कामाच्या ठिकाणी आयुक्तांनी रविवारी (दि. १) अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक मापदंडानुसार आरएस-१ बिटुमन मिश्रण वापरणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात व्हीजी-३० बिटुमन वापरून काम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ही गंभीर बाब लक्षात येताच आयुक्तांनी कोणताही विलंब न करता काम तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. तसेच चुकीच्या पद्धतीने टाकलेला रस्त्याचा थर पूर्णपणे काढून टाकून, निर्धारित आरएस-१ मिश्रणानेच नव्याने व दर्जेदार काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश कंत्राटदार व संबंधित मनपा अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मनपाचे गुणवत्ता अभियंता नितीन पाटील, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयुक्तांच्या या थेट कारवाईमुळे शहरातील कंत्राटदार व मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेला स्पष्ट संदेश गेला असून, नाशिकमध्ये सुरू असलेल्या सर्व विकासकामांवर कठोर देखरेख आणि झीरो टॉलरन्स धोरण प्रभावीपणे राबवले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागरिकांच्या करातून होणाऱ्या प्रत्येक विकासकामात गुणवत्ता हीच अंतिम कसोटी आहे. निकृष्ट काम करणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही.
- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका

