

मालेगाव (नाशिक) : किल्ला पोलिस ठाण्यातील बनावट जन्म दाखला प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात 269 संशयितांविरुद्ध सोमवारी (दि. 15) न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले.
संशयितांची विक्रमी संख्या लक्षात घेता न्यायालयाने ही प्रक्रिया सुलभ आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी विशेष व्यवस्था न्यायालयाच्या आवारात केली होती. यावेळी एका स्वतंत्र टेबलाची व्यवस्था करण्यात येऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रसंगी संशयित, त्यांचे कुटुंबीय आणि बघ्यांमुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. प्रक्रियेदरम्यान, प्रत्येक संशयिताचा पुकारा करून त्याची सही घेण्यात आली आणि आरोपपत्र दाखल करण्याचे काम व्यवस्थितपणे पार पाडले गेले. यावेळी उपस्थित असलेल्या संशयितांना पुढील प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या तारखांना 10 ते 12 जणांच्या गटांमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तारखांना ते जामीन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. ही प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी न्यायालयाने केलेल्या विशेष व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यवाही सुरळीत पूर्ण झाली. यामुळे संशयित आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रक्रियेची माहिती व्यवस्थितपणे मिळाली आणि कोणताही गोंधळ टळला. पुढील सुनावणीसाठी संशयितांना दिलेल्या तारखांनुसार प्रक्रिया पुढे सुरू राहील.
मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे सहकार्य
यावेळी पोलिसांनी बोलावलेल्या नागरिकांना मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे माजी आमदार आसिफ शेख, समाजवादी पार्टीच्या शान- ए- हिंद यांनी संबंधितांना आज झालेल्या व पुढील कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पुढील न्यायालयीन कारवाईसाठी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे वकील सर्वतोपरी सहकार्य करतील, असे आश्वासन माजी आमदार शेख यांनी दिले.