

गंगापूर (नाशिक) : गंगापूर धरणावर उभारण्यात आलेल्या बोट क्लब परिसरात प्रेमीयुगलांकडून नियमांची ऐशीतैशी केली जात असून, त्यांना आवर घालण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे दिसून येत आहे.
गंगापूर धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे बोट क्लब परिसरातील बहुतांश भागात जाण्यास मनाई आहे. त्यासाठी जागोजागी 'नो एंट्री'चे फलक लावले आहेत. मात्र, प्रेमीयुगल त्याच भागात 'एंट्री' करीत असल्याने नियमांचा भंग होत आहे. याशिवाय प्रेमीयुगलांच्या वर्तनामुळे सहपरिवार येणाऱ्या पर्यटकांना येथून काढता पाय घ्यावा लागत आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चालविल्या जाणाऱ्या बोट क्लबमध्ये कॅफे असल्याने, याठिकाणी प्रेमीयुगलांचा नेहमीच वावर असतो. याशिवाय सहपरिवार येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या मोठी असते. सध्या गंगापूर धरण काठोकाठ भरलेले असून, चहुबाजुने निसर्गसंपदा बहरली आहे. हिरवळीमुळे मोठ्या संख्येनी पर्यटक याठिकाणी येत आहेत.
मात्र, काही प्रेमीयुगल नियम पायदळी तुडवत आहेत. धरणाच्या काठालगत खुर्च्या टाकून त्याठिकाणी गैरवर्तन करीत आहेत. वास्तविक, धरणाच्या पात्रात जाण्यास सक्त मनाई आहे. मात्र, अशातही याठिकाणी असुरक्षितपणे प्रेमीयुगलांचा वावर असल्याने, अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. या प्रेमीयुगलांना आवर घालण्यासाठी कुठलीच यंत्रणा नाही. बोट क्लब सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असतो. मात्र, प्रेमीयुगल रात्री उशिरापर्यंत धरण परिसरात वावरत असल्याचेही निर्दशनास आले आहे. दरम्यान, प्रेमीयुगलांनी याठिकाणी येण्यास मनाई नाही, मात्र त्यांनी नियमांचे पालन करावे. बरेच पर्यटक सहकुटुंब याठिकाणी येतात. मात्र, प्रेमीयुगलांच्या वर्तनामुळे ते याठिकाणाहून काढता पाय घेत आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
तळीरामांचा देखील या परिसरात वावर वाढला आहे. धरणाच्या काठावरच रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगत असून, यंत्रणांकडून याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. तर गंगापूर धरणाचा बॅक वॉटर परिसर मोठा असून, प्रत्येकाकडे लक्ष देणे अशक्य असल्याचे एमटीडीसीकडून सांगितले जात आहे.
आमच्याकडे बोट क्लबची जबाबदारी असून, नियमांचे पालन कोण करते आणि कोण करत नाही हे बघण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र, अशातही कोणाची तक्रार असेल तर त्याबाबत लक्ष घातले जाईल.
जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी