नाशिक : जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. गुरुवारी (दि.१३) पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. कोतवाल यांच्या प्रवेशाने काँग्रेसचे दुसरे माजी जिल्हाध्यक्षही 'भाजपवासी' झाले.
भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात मंत्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, दक्षिण जिल्हाध्यक्ष यतीन कदम, लक्ष्मण सावजी उपस्थित होते.
पक्ष प्रवेशानंतर कोतवाल यांनी सांगितले की, आजपासून आम्ही भाजपवासी झालो आहोत. कोणत्याही स्वार्थासाठी किंवा अटींसाठी आम्ही पक्षात आलो नाही. देशाच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून मी नाराज होतो. ती नाराजी वाढत गेली आणि अखेर या पक्षप्रवेशात रुपांतर झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार आहेर यांनी मी तीन निवडणुका कोतवाल यांच्या विरोधात लढलो. पण कधीही वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही. आम्ही नेहमीच तत्त्वांवर आधारित राजकारण केले. भाजपमध्ये आल्याने आमचा बालेकिल्ला आणखी मजबूत झाल्याचे सांगितले.
हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश : महाजन
यावेळी मंत्री महाजन म्हणाले, शिरीषभाऊ, आजपासून तुम्ही अधिकृतपणे भाजपवासी झाला आहात. देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात तुम्ही सामील झाला आहात. आता यापुढे कुठेही जाण्याची वेळ येणार नाही. आम्ही तुमच्या सर्व अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आतापर्यंत तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत काम केले. आठ वेळा आमदारकीची निवडणूक लढवली आहे. मात्र, आता हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश आहे, असे सांगितले.
काॅंग्रेस, मनसे, राष्ट्रवादीलाही धक्का
ग्रामीणमध्ये काँग्रेसला धक्का देत असताना शहरातही भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला धक्का दिला. माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, मनसेच्या गटनेत्या नंदिनी बोडके, नरेश पाटील, नीलम पाटील, कादवा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे गौरव गोवर्धने यांनीही भाजपात प्रवेश केला.