

नाशिक : पंचवटीतील गोळीबार प्रकरणात रविवारी (दि. २१) अटक करण्यात आलेले भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील तसेच रोहन भुजबळ या दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची (दि. २६ पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणांमध्ये आणखी एका राजकीय लोकप्रतिनिधीच्या अटकेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याबाबत पंचवटीमध्ये चर्चा रंगली आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना फुलेनगर पंचवटी येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून अटक करण्यात आली होती. त्यांना सोमवारी (दि. 22) न्यायालयात हजर केले असता, पाटील आणि भुजबळ यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सागर विठ्ठल जाधव याच्यावर बुधवारी (दि. १७) राहुलवाडी, फुलेनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास वर्चस्ववादातून गोळीबार झाला होता. त्यात जाधव गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्यांना मदत व कटकारस्थानामध्ये सहभागी असण्याचा आरोप जगदीश पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्यामधील प्रमुख आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ, विकी उत्तम वाघ, अमोल पारे उर्फ बबल्या व इतर साथीदार यांचा शोध मात्र अजूनही पोलिसांना लागलेला नाही.
अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये पंचवटीतील खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेला शेखर निकम याला नाशिकरोड येथे जिल्हा न्यायलयात एका अन्य प्रकरणातील सुनावणीसाठी आणले होते. त्या दरम्यान, नाशिकरोड येथील लॉजमध्ये सागर जाधववर गोळीबार करणारे आरोपी माजी नगरसेवक जगदीश पाटील व शेखर निकम यांच्यात बैठक झाली होती. ही माहिती गोळीबार प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाल्यावर तसेच सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर तपासले असता त्यात जगदीश पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना या प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आले आहे.