

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पंचवटीत फुलेनगर येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी रविवारी (दि. २१) अटक करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये असताना भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या अगोदर राहुल धोत्रे हत्याकांडामध्ये भाजपचेच माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक झाल्यानंतर ते मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यामुळे गेल्या 15 दिवसांत गंभीर गुन्ह्यात भाजपच्या दोन माजी नगसेवकांना अटक झाली आहे.
राहुलवाडी, फुलेनगर येथे बुधवारी (दि. १७) सागर विठ्ठल जाधव याच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास वर्चस्ववादातून गोळीबार झाला होता. यामध्ये सागर जाधव गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सद्यस्थितीत खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणांमध्ये मागील आठवड्यात ११ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, या गुन्ह्यामधील प्रमुख आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ, विकी उत्तम वाघ, अमोल पारे उर्फ बबल्या व इतर साथीदार यांचा मात्र शोध अजूनही पोलिस यंत्रणा घेत आहे. सागर विठ्ठल जाधव याला दोन गोळ्या लागल्या होत्या. शस्त्रक्रियेद्वारे त्याची प्रकृती सध्या गंभीर पण स्थिर असल्याचे सांगितले जाते.
योगेश माधव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून सागर जाधव याच्यावर गोळीबार करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली होती. ही घटना वर्चस्व व टोळीवादातून झाल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय किनारही आहे. या घटनेमुळे शहर, परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.
या गुन्हयातील जखमी सागर जाधव हादेखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच सहभागी आरोपींपैकी नितीन रमेश खलसे, साहिल फिरोज शेख, योगेश भीमराव जाधव, विकी उत्तम वाघ, विकास उर्फ विकी विनोद वाघ हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.