BJP Internal Conflict | भाजपांतर्गत वाद चव्हाट्यावर

BJP Internal Conflict | भाजपांतर्गत वाद चव्हाट्यावरमहाजन-चौधरी व्हायरल क्लिप ; कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

नाशिक / जळगाव : पुढारी वृत्तसेवा

नंदुरबारमधील कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाचा वाद अद्याप शांत झालेला नसतानाच, भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाची आणखी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.

BJP
CM Pramod Sawant | 'नशामुक्त भारत'ला जोडून 'नशामुक्त गोवा' अभियान

या कथित संभाषणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

"संबंधित कथित ध्वनिफितीची गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. 'मी माझ्या वकिलांचा सल्ला घेत असून या प्रकरणात लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे.'"

— एकनाथ खडसे, आमदार

"गटाराचे झाकण उघडल्यावर जशी घाण बाहेर पडते, तशीच घाणेरडी भाषा या संभाषणातून बाहेर आली आहे. भाजपतील महिला कार्यकर्त्यांनी सावध राहावे."

— रोहिणी खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी (शरद पवार)

यापूर्वी व्हायरल झालेल्या एका कथित ध्वनिफितीत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षातील माजी खासदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने पक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली असून, नंदुरबार येथे या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत कारभारावर प्रश्न उपस्थित करत टीका केली होती.

दरम्यान, आता समोर आलेल्या नव्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी हे एकनाथ खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, खडसे कुटुंबाकडून भाजपवर सातत्याने टीका होत असल्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही कथित संभाषणात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

BJP
Mumbai- Goa Highway | "मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडण्यास प्रारंभ! पणदूर अन् वेताळबांबर्डेतील खड्डा ठरतोय जीवघेणा"

या कथित संभाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी चौधरी यांच्या वक्तव्याला विरोध केला नाही, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी महाजन यांचे प्रतिसाद ऐकू येत असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे महाजन आणि खडसे यांच्यातील दीर्घकालीन राजकीय मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आ. एकनाथ खडसे यांनी संबंधित कथित ध्वनिफितीची गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. "मी माझ्या वकिलांचा सल्ला घेत असून, या प्रकरणात लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे," असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, या प्रकरणावर भाजपची अधिकृत भूमिका काय असेल आणि तपासातून पुढे कोणती माहिती समोर येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news