

पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक मधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात संचालक मंडळाने अविश्वास ठराव दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला आहे. 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात असून अविश्वास प्रस्ताव सादर करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक बाजार समितीत भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आमनेसामने आहे. विद्यमान सभापती देविदास पिंगळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. बाजार समितीवर असलेल्या एकुण 18 सदस्यांपैकी 15 सदस्यांनी विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास दाखल केला आहे. विशेष: म्हणजे हे सदस्य पिंगळे यांच्यासोबतच निवडून आले आहेत. भाजप मध्ये गेलेले माजी सभापती शिवाजी चुंभळे यांची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. चुंभळे यांनी संचालकांना आपल्याकडे वळवत पिंगळे यांच्यावर अविश्वास आणला आहे.
आजवर नाशिकच्या बाजार समितीत चुंभळे विरुद्ध पिंगळे असा सामना पाहायला मिळाला आहे. पिंगळे व चुंभळे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले माजी खासदार देविदास पिंगळे यांना भाजपचे शिवाजी चुंभळे यांनी विरोध दर्शवला आहे. बाजार समितीच्या 15 सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पिंगळे यांच्या अविश्वास ठरावा संबधी निवेदन दिले आहे. देविदास पिंगळे यांचा मनमानी कारभार असून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप संचालकांनी केला आहे.
या ठरावाबाबत 11 मार्च रोजी संचालक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होईल याची प्रतीक्षा असून त्यामुळे आता पिंगळे यांचे सभापती पद धोक्यात आले आहे.