

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : राहुल कर्डिले यांच्या रूपाने तब्बल सहा वर्षांनंतर नाशिक महापालिकेला थेट आयएएस अधिकारी आयुक्तपदी लाभल्यामुळे नाशिककर आनंदात असताना कर्डिले यांच्या नियुक्तीला काही तासांतच ब्रेक लागला आहे. राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असून नाशिक महानगरविकास प्राधिकरणाच्या सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांची नाशिकच्या मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्याचे कारण म्हणजे प्रामुख्याने मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासकीय राजवटीतील अनागोंदी कारभारामुळे चर्चेत आलेल्या डॉ. अशोक करंजकर यांच्या जागी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी (दि. २४) सायंकाळी राज्य शासनाकडून जारी केले गेले. मात्र काही तासांतच ही नियुक्ती रद्द करण्यात आली. नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी मनिषा खत्री यांच्या नियुक्तीचे आदेश सामन्य प्रशासन विभागाने आज दि. (26) दिले आहेत.
मनीषा खत्री या मुळच्या हरियाणा राज्यातील सोनीपत येथील आहेत. त्या २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या नाशिक महानगरविकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या काम पाहत होत्या. यापूर्वी त्यांनी नागपूर येथे अप्पर आयुक्त आदिवासी, अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाचोरा येथे उपविभागीय अधिकारी या पदांवर काम केले आहे. मेळघाट परिसरातील कुपोषण आणि आरोग्यसंदर्भात विशेष उपक्रम राबविले आहेत. त्या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी देखील राहिल्या आहेत.