

जळगाव
प्रेमविवाह केल्याच्या रागातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना भुसावळ शहरात आणि जवळच असलेल्या खडका गावात घडली आहे. घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी चेतन दिलीप जंगले (२५, रा. खडका) या तरुणाला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी तरुणाची नग्न धिंड काढत, त्याचा रुमालाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून, पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
सुहास हॉटेलजवळ थरार अन् पाशवी मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, खडका येथील चेतन जंगले याने शहरातील एका १८ वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह केला होता. दोघेही एकाच समाजाचे असूनही मुलीचे नातेवाईक या लग्नामुळे प्रचंड संतप्त होते. शुक्रवारी (२० मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास चेतन आपल्या पत्नीसह मामा संतोष महाजन यांच्याकडे (सुहास हॉटेल परिसर) थांबला होता.
यावेळी मुलीचे काका मनोज पाटील, मावशी रुपाली ऊर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील आणि इतर १० ते १२ जणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी सुरुवातीला चेतनच्या मामाला धमकावून बाजूला केले आणि त्यानंतर चेतन व त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली.
नग्न धिंड अन् दहशतीचा नंगा नाच
आरोपींनी चेतनला पकडून रुमालाने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या चेतनला पकडून संशयितांनी एका दूध डेअरी जवळ नेले. तिथे त्याचे कपडे फाडून त्याला पूर्णपणे विवस्त्र करण्यात आले. भररस्त्यात त्याची नग्न धिंड काढत आरोपींनी माणुसकीचा अंत पाहिला. "तुझ्या मुलीला सोडून देतो," असे त्याच्याकडून सक्तीने वदवून घेतले आणि त्यानंतर त्याला एका रिक्षात बसवून खडका गावात नेण्यात आले.
गावात घुसून घराची जाळपोळ करण्याची धमकी
संशयितांचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी खडका गावातील बस स्टँडपासून चेतनच्या घरापर्यंत पुन्हा त्याला विवस्त्र अवस्थेत नेले. तिथे त्याच्या आई-वडील आणि बहिणीच्या पतीलाही बेदम मारहाण करण्यात आली. "तुमचे घर पेटवून देऊ," अशी धमकी देत या गुंडांनी परिसरात दहशत निर्माण केली. अखेर स्थानिक नागरिकांनी धडाडी दाखवत चेतनची सुटका केली. या हल्ल्यात चेतनचा हात मोडला असून त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
पाच जणांना पोलीस कोठडी, इतरांचा शोध सुरू
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत कोमल पाटील, हेरंब चौधरी, संजय बढे, विजय पाटील आणि ज्ञानेश्वर भोई या पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. "अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून माणुसकीला काळिमा फासणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे," असे पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांनी स्पष्ट केले.