

नाशिक : गॅस सिलिंडर तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या १७ पथकांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर वितरकांची तपासणी करून त्यांच्या मार्फत होणाऱ्या वितरणाचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर वितरणात सुरळीतपणा आला आहे. नागरिकांची गर्दीही कमी झाली आहे. दरम्यान, तपासणीत आतापर्यंत तीन कारवाया केल्या आहेत. त्यात सातपूर येथील मोठ्या कारवाईचा समावेश आहे. दोन किरकोळ हॉटेल व्यावसायिकांविरुद्धच्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात रॉकेलपुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात ९ लाख रेशन कार्डधारक आहेत. प्रत्येक कार्डावर २ लिटरप्रमाणे रॉकेल देण्याचे नियोजित आहे. जिल्ह्यात घाऊक रॉकेल परवानाधारक १२७ व अर्धघाऊक ५४ परवानाधारक आहेत. त्यांच्यामार्फत वितरण केले जाणार आहे. मात्र, हे संभाव्य नियोजन आहे. वितरण नियोजनातून नाशिक शहर व मालेगाव ही शहरे वगळण्यात आलेली आहेत.
केवळ ग्रामीण भागातच रॉकेल वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ९ लाख रेशन कार्डधारक आहेत. मात्र, शहरी भाग वगळल्यावर किमान पावणेतीन लाख कार्डधारक कमी होऊन सुमारे ६ लाख कार्डधारकांना प्रतिदोन लिटर याप्रमाणे रॉकेल वितरण केले जाईल. त्यामुळे प्रशासनाने १२ लाख लिटर रॉकेलसाठी जिल्हासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. ते अधिकृत परवानाधारक वितरकांमार्फत ग्राहकांना दिले जाईल.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संभाव्य नियोजन म्हणून रॉकेलचा पर्याय आहे. पूर्वनियोजन म्हणून १२ लाख लिटर्स रॉकेलची नोंदणी शासनाला कळवली आहे. ग्रामीण भागासाठी नियोजन आहे. गॅस वितरण सुरळीत झाले आहे.
— रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी
गुरुवारी (दि. १९) झालेल्या तपासणीत पथकांनी १२९ वितरकांपैकी ७३ वितरकांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्या २० दिवसांत केवळ ३ कारवाया झाल्या आहेत. त्यात इगतपुरी व कळवण येथे दोन ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. सातपूर परिसरात वाहनासह झालेली २५ लाखांचा काळा बाजारातील सिलिंडर जप्तीची कारवाईचा समावेश आहे. त्यानंतर कुठेही गैरप्रकार आढळून आलेला नाही.
या तपासणीमुळे वितरकांकडून ग्राहकांना सहकार्य केले जात असल्याने वितरण व्यवस्थापन सुरळीत झाले आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी दिली. दरम्यान गुरुवारी १३ हजार ४६२ ग्राहकांना गॅस वितरण करण्यात आले. १० व्यावसायिक सिलिंडरचे वितरण झाले आहे. आता वितरकांकडे १० हजार ८४२ सिलिंडर साठा आहे.