Bhivtas Waterfall | निसर्गसौंदर्याबरोबर आदिवासी खाद्यसंस्कृतीचीही पर्वणी; सुरगाण्यात पर्यटनाला नवी झळाळी

Bhivtas Waterfall | भिवतास धबधबा करतोय पर्यटकांना आकर्षित
Bhivtas Waterfall
Bhivtas Waterfall Sai Sawant, Pudhari
Published on
Updated on

दिंडोरी/जानोरी : पुढारी वृत्तसेवा


मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील केळवण गावाजवळील भिवतास धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, त्याचे रौद्र आणि नयनरम्य रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सुमारे हजार फूट उंचीवरून कोसळणारी जलधारा, डोंगररांगांवर पसरलेले धुके, सर्वदूर बहरलेली हिरवाई आणि ढगांनी वेढलेला परिसर यामुळे भिवतास धबधबा पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.

Bhivtas Waterfall
Nashik Pune Railway | नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा वाद अखेर सुटणार! डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

नाशिक जिल्ह्यासह गुजरात राज्यातूनही पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत असून, शनिवार व रविवारी परिसरास जत्रेचे स्वरूप येत आहे. केळवण, आंबोडे आणि खोकरविहीर परिसरातील नाल्यांचे पाणी मोठ्या वेगाने भिवतास धबधब्यात एकवटत असल्याने धबधबा सध्या दुथडी भरून वाहत आहे.

प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या पाण्याच्या गडगडाट, धुक्याने झाकोळलेले डोंगर आणि हिरव्यागार दऱ्यांचे विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकांसाठी हे ठिकाण पर्वणी ठरत असून, धबधब्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

धबधब्याच्या निसर्गसौंदर्याबरोबरच येथील आदिवासी खाद्यसंस्कृतीही पर्यटकांना आकर्षित करत आहे. स्थानिक आदिवासी बांधव घरगुती पद्धतीने चुलीवर तयार केलेली उडदाची डाळ, नागलीची भाकरी, विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच गावरान चवीचे पारंपरिक पदार्थ अतिशय आत्मीयतेने पर्यटकांना वाढत आहेत.

या अस्सल आदिवासी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येथे थांबत असून, पर्यटनामुळे स्थानिक आदिवासी कुटुंबांना हंगामी रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे. पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे चित्र सध्या परिसरात पाहायला मिळत आहे.

सर्वोत्तम पर्यटन हंगाम : जुलै ते सप्टेंबर

  • विशेष आकर्षण : धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा, दाट हिरवाई आणि प्रचंड जलधारा

  • खाद्यपदार्थ : उडदाची डाळ, नागलीची भाकरी, रानभाज्या आणि पारंपरिक आदिवासी जेवण

हे टाळा...

सध्या धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने पर्यटकांनी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाने, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेचे भान राखणे आवश्यक आहे.

Bhivtas Waterfall
Nashik Pune High Speed Rail: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गाचा अभ्यास डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीकडे; राज्य शासनाचा निर्णय

पर्यटनातून आदिवासींना रोजगार

भिवतास धबधबा येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासी कुटुंबांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. घरगुती पद्धतीने चुलीवर तयार केलेली उडदाची डाळ, नागलीची भाकरी, विविध प्रकारच्या रानभाज्या आणि गावरान खाद्यपदार्थ पर्यटकांना प्रेमाने वाढले जात आहेत.

त्यामुळे पर्यटकांना अस्सल आदिवासी खाद्यसंस्कृतीचा अनुभव मिळत असून, स्थानिकांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडत आहे. पर्यटनामुळे परिसरातील स्वयंरोजगाराला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news